डिफेंडर कारमुळे शिंदेंचे आमदार पुन्हा वादात!

डिफेंडर कारमुळे शिंदेंचे आमदार पुन्हा वादात!

| Updated on: Oct 19, 2025 | 11:25 AM

आमदार संजय गायकवाड एका महागड्या डिफेंडर कारमुळे चर्चेत आहेत. मराठवाडा पूरग्रस्तांना २५ लाख रुपयांची मदत केल्यानंतर काही दिवसांतच दीड कोटींची गाडी घेतल्याचा आरोप स्थानिक भाजप नेत्यांकडून झाला. गायकवाड यांच्या मते, गाडी त्यांची नसून कंत्राटदार नातेवाईक निलेश ढवळे यांची आहे, जी त्यांनी कर्जावर घेतली आहे.

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड एका लँड रोव्हर डिफेंडर गाडीमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. ही गाडी सव्वा ते दीड कोटी रुपये किमतीची असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, १५ दिवसांपूर्वीच गायकवाड यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी स्वतःचा फ्लॅट विकून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २५ लाख रुपयांची मदत केल्याचे वृत्त होते. आता या महागड्या गाडीच्या खरेदीमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्थानिक भाजप नेत्यांकडूनच गायकवाड यांच्यावर हा आरोप करण्यात आला आहे. मात्र, या आरोपांना उत्तर देताना आमदार गायकवाड यांनी स्पष्ट केले की, ही गाडी त्यांची नसून त्यांच्या नातेवाईक आणि पक्षाचे कार्यकर्ते असलेल्या निलेश ढवळे नावाच्या कंत्राटदाराची आहे. ढवळे यांनी दीड कोटी रुपयांचे कर्ज घेऊन ही गाडी खरेदी केली असून, त्यांची जुनी लेजेंडर गाडी विकून त्यांनी डाउन पेमेंट भरले आहे. गाडीवर महाराष्ट्र राज्य विधानसभा सदस्य असा लोगो असला तरी, अनेक कार्यकर्ते त्यांच्या गाड्यांवर असे लोगो लावत असतात, असे गायकवाड यांनी म्हटले. त्यांनी पत्रकारांना या प्रकरणाची अधिक चौकशी करण्याचे आवाहन केले आहे.

Published on: Oct 19, 2025 11:25 AM