Sanjay Raut : ‘ते’ महाराष्ट्राचं काय भलं करणार? कॅबिनेटवेळी फडणवीसांनीही खुर्चीखाली वाकून बघावं…अघोरी पुजेवरून राऊत संतापले
निवडणुकीच्या पूर्वी अघोरी पूजा केली,असा आरोप वसंत मोरेंकडून करण्यात आल्यानंतर आता अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांकडून भरत गोगावलेंचा आणखी एक दुसरा व्हिडीओ ट्विट करण्यात आला. यावरूनच राऊतांनीही शिंदे आणि फडणवीसांवर हल्लाबोल केलाय
गुवाहाटीच्या बगलामुखी येथून महाराज आणून गोगावले यांनी निवडणुकीच्या पूर्वी अघोरी पूजा केली असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. तर त्याचे व्हिडीओ देखील समोर आलेत. यावर बोलताना राऊतांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली. ‘शिंदेंचा एक गट आहे. तो अघोरी विद्येतून निर्माण झाला आहे. हा गट सर्वत्र असतो. हा गट दिवस रात्र अघोरी विद्येत असतात. माझा कसा फायदा होईल हे पाहत असतात. ही अंधश्रद्धा असली तरी आपल्या दुर्दैवानं पुरोगामीपणाला डाग लावणारं हे कृत्य आहे. अशा लोकांच्या हातात राजकारण गेलं असेल तर महाराष्ट्राचं कमालीचं दुर्देव आहे.’, असं संजय राऊत म्हणाले.
तर कोणत्या प्रकारचे लोकं फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीला बसण्यापूर्वी खुर्चीखाली वाकून पाहिलं पाहिजे, असा खोचक सल्लाही राऊतांनी यावेळी दिला. पुढे राऊत असेही म्हणाले, महाराष्ट्राला काळीमा फासणारं हे कृत्य आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. जसे ते मंत्र्यांचे पीए तपासून घेतायत तसे मंत्री ही तपासले पाहिजे. असे अघोरी विद्येत रममान असलेले मंत्री महाराष्ट्राचं काय भलं करणार? असा सवालही राऊतांनी केलाय.
