Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही…
संजय राऊत यांनी अमित शहांवर जोरदार टीका केली आहे. शहा यांना पंतप्रधान होण्याची घाई असून त्यांनी महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले, मराठी माणसाची एकजूट तोडली आणि बाळासाहेब ठाकरेंच्या संघटनेवर कुऱ्हाड चालवली, असा आरोप राऊत यांनी केला. देशातून हुकूमशाहीचे विघ्न दूर करण्याची प्रार्थना त्यांनी बाप्पाकडे केली.
संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. राऊत यांच्या मते, अमित शहा यांना देशाचे पंतप्रधान होण्याची घाई झाली असून, ते सारखे मुंबईत येत आहेत. शहा हे संघाच्या पसंतीचे व्यक्ती नाहीत. संघाच्या मनातल्या व्यक्ती महाराष्ट्रातून दोन तर मध्यप्रदेशातून एक आहेत, असे राऊत यांनी सांगितले. शहा वारंवार महाराष्ट्रात येऊन संघाला आपली निष्ठा दाखवू इच्छितात, असेही राऊत म्हणाले. इतकेच नाही तर आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी देवाकडे देशातील हुकुमशाही संपव अशी मागणी केली आहे.
राऊत यांनी अमित शहांवर महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान केल्याचा आरोप केला. शहांनी मराठी माणसाची भक्कम एकजूट तोडली, महाराष्ट्राला तोडण्याचा प्रयत्न केला आणि बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेल्या संघटनेवर अत्यंत निर्घृण पद्धतीने कुऱ्हाड चालवली, असे राऊत म्हणाले. त्यामुळे शहांविषयी कोणतीही सहानुभूती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, एका प्रश्नावर राऊत यांना विचारण्यात आले की, संघाचे दोन प्रमुख अजेंडे, राम मंदिर आणि कलम ३७० हटवणे, हे पूर्ण झाले आहेत आणि आता समान नागरी कायद्याचा एकमेव अजेंडा मोदी व शहा यांच्या काळात पूर्णत्वास येत आहे.
