Sanjay Raut : त्यांचा स्थापना सोहळा सुरतला व्हायला पाहिजे; वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राऊतांची शिंदेसेनेवर टीका
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा सायन येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडत आहे.
मुंबईत शिवसेनेची बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी स्थापना केली. तुमचा पक्ष गुजरातमध्ये स्थापन झाला, तर तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो कसाकाय लावू शकता? तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत, त्यांचा फोटो तुम्ही लावा, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा सायन येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडत आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी संजय राऊत यांनी आपल्या भाषणातून शिंदेसेनेवर आणि भाजपवर टीका केली. दरम्यान, आजच्या दिवशी उद्धव ठाकरे मनसेसोबतच्या युतीबाबत काय घोषणा करतात? याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. ज्यांचा जन्म दोन वर्षांपूर्वी झाला, त्यांनाही वाटते आपण ५९ वर्षांचे झालो. त्यांच्या पक्षाचा स्थापना सोहळा मुंबईत करणे हा मराठी माणसाचा अपमान आहे. त्यांचा स्थापना सोहळा सुरतला व्हायला पाहिजे, अशी टीका देखील संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली.
