धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात परतण्याची तारीख ठरली? काँग्रेस नेत्याचे संकेत की टोमणा? वक्तव्यानं चर्चांना उधाण
छगन भुजबळ यांना मंत्री होऊन अडीच महिने झाले असले तरी अद्याप त्यांना सरकारी बंगला मिळालेला नाही. तर दुसरीकडे मंत्रीपदाचा राजीनामा देऊन साडेचार महिने लोटले असले तरी अद्याप धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगला सोडलेला नाही. यावर सतेज पाटलांनी भाष्य केले.
महायुती सरकारमध्ये सहा महिन्यांनी छगन भुजबळांना मंत्रीपदाचा लालदिवा तर मिळाला मात्र सरकारी बंगला अजूनही मिळालेला नाही. कारण सरकारनं सातपुडा बंगला मंत्री भुजबळांना दिलाय. पण तिथला ताबा अद्याप माजी मंत्री धनंजय मुंडेंनी सोडलेला नाही. त्यामुळे भुजबळ मंत्री पद मिळाल्यापासून त्यांच्या सांताक्रूजमधल्या खाजगी घरात राहताहेत. आपल्याला अद्याप शासकीय बंगला मिळालेला नाही हे सांगताना भुजबळांच्या चेहऱ्यावर काहीशी नाराजी होती. भुजबळ बंगल्यासंदर्भात जवळपास सगळ्याच मुद्द्यांवर बोलले आणि शेवटी आमच्या पक्षातल्याच सहकाऱ्याची मी काय तक्रार करणार असंही त्यांनी सांगितलं होतं. दरम्यान, यासंदर्भात काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी भाष्य केले आहे. ‘धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळात परतण्याची तारीख ठरली असावी’, असे सतेज पाटील खोचकपणे म्हणाले. इतकंच नाहीतर मुंडेंना कोणीतरी आश्वासन दिलं असेल आणि म्हणून त्यांनी अद्याप त्यांनी सातपुडा हा शासकीय बंगला सोडलेला नाही, असं म्हणत त्यांनी मुंडेंवर निशाणा साधला.
