Sangli : फॉर्च्युनर, थार, ट्रॅक्टर अन् 150 बाईक्स… शिंदे सेनेकडून भव्य बैलगाडा शर्यत, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बक्षिसांचा वर्षाव
स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगलीत शिंदे सेनेने भव्य बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांच्या नेतृत्वात होणाऱ्या या स्पर्धेत विजेत्यांना दोन फॉर्च्युनर, दोन महिंद्रा थार, सात ट्रॅक्टर आणि दीडशे मोटरसायकल्स अशी कोट्यवधींची बक्षिसे दिली जातील.
ग्रामीण भागात आगामी निवडणुकांचे बिगुल वाजत असतानाच, सांगलीमध्ये शिंदे सेनेकडून एका भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या स्पर्धेत विजेत्यांवर बक्षिसांचा अक्षरशः पाऊस पाडला जाणार आहे. विजेत्या बैलगाडा मालकांना दोन फॉर्च्युनर कार, दोन महिंद्रा थार, सात ट्रॅक्टर आणि तब्बल दीडशे मोटरसायकल्स अशी भरघोस बक्षिसे मिळतील.
एका फॉर्च्युनर कारची किंमत सुमारे 40 लाखांपासून 60 लाखांपर्यंत असून, महिंद्रा थारची किंमत 14 लाखांपासून 25 लाखांच्या घरात आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांची बक्षिसे या बैलगाडा स्पर्धेमध्ये दिली जाणार आहेत. येत्या 9 नोव्हेंबर रोजी तासगाव येथे या शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटातून लढलेले आणि नंतर शिंदे गटात सामील झालेले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा भरवली जात आहे. या स्पर्धेत सुमारे चार ते पाच लाख बैलगाडा स्पर्धक सहभागी होण्याचा अंदाज आहे. स्पर्धेतील कोट्यवधींच्या बक्षिसांच्या आकड्यांकडे आगामी निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने पाहिले जात आहे.
