Shivsena | आधीच सुनावणी झाली असती तर शिंदेंचं सरकार आलंच नसतं; सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी निश्चित केली आहे. आज झालेल्या सुनावणीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी प्रामुख्याने आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर न्यायालयात युक्तिवाद केला.

युक्तिवादादरम्यान कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितले की, जर आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर वेळेत निर्णय झाला असता, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होण्याची वेळच आली नसती. त्यांनी दहाव्या अनुसूचीतील तरतुदींनुसार आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर तातडीने निर्णय होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अनिल देसाई यांनी सर्वोच्च न्यायालयाकडून लोकशाहीच्या मूल्यांना साजेसा आणि न्याय्य निर्णय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. या प्रकरणात न्यायालय योग्य भूमिका घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, ही सुनावणी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 41 आमदारांवर अपात्रतेची कारवाई न केल्याच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्या आमदारांवर कारवाई न करण्याचा निर्णय दिल्यानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आता या महत्त्वाच्या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होणार असून, राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.