tv9 Marathi Special Report | सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं? संपूर्ण व्हिडिओ बघाच
मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून पाठिंबा मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आठ खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सुमारे 15 मिनिटे झालेल्या या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून पाठिंबा मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आठ खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सुमारे 15 मिनिटे झालेल्या या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
मात्र, या भेटीचा राजकीय अर्थ काढण्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी बैठकीमागील भूमिका स्पष्ट केली आहे. संसदेतील कामकाज सुरळीत होत नसल्याने मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. खासदारांच्या मतदारसंघातील विविध प्रश्नांची माहिती पंतप्रधान मोदी यांच्यासमोर मांडण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत महाराष्ट्राशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडण्यात आले. महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी खासदारांनी केली. तसेच मराठवाड्यासाठी विशेष मदत निधी आणि दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी पॅकेज जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.
उजनी धरणातून मांजरा नदीत पाणी सोडण्याचा मुद्दाही बैठकीत मांडण्यात आला. यासोबतच पीक विमा योजनेत सुधारणा करण्याची मागणी, कांद्याच्या दराचा प्रश्न, नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला गती देणे आणि पुणे-नाशिक मेट्रो प्रकल्पाचा मुद्दा पंतप्रधानांसमोर मांडण्यात आला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पीएम गती शक्ती योजना राबवावी, कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाचे काम जलदगतीने पूर्ण करावे आणि जेएपीटीशी संबंधित प्रश्न सोडवावेत, अशी मागणीही करण्यात आली. तसेच नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लवकर प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी खासदारांनी केली.
गंभीर आजारांवरील उपचारासाठी पीएम केअर्स फंडांतर्गत खासदारांच्या निधीत वाढ करावी, कॅन्सर उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा आणि चंद्रभागा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न सोडवावा, अशा विविध मागण्याही या बैठकीत मांडण्यात आल्या.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील खासदारांची पंतप्रधान मोदींसोबत भेट झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट NDA मध्ये सहभागी होणार का, याबाबत राजकीय चर्चांना सुरुवात झाली. मात्र, खासदार बजरंग सोनवणे यांनी या शक्यता स्पष्टपणे फेटाळून लावल्या. “आम्ही विरोधी पक्षात आहोत आणि तिथेच राहू,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक घेणे म्हणजे सत्ताधाऱ्यांसोबत जाणे असा अर्थ होत नाही, असेही बजरंग सोनवणे यांनी स्पष्ट केले. लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघातील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. संसदेत सध्या कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याने जनतेच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी अशा भेटी महत्त्वाच्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही या भेटीवर भूमिका स्पष्ट केली. राजकीय मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित विविध प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली, असे त्यांनी सांगितले.
त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली झालेली ही भेट राजकीयदृष्ट्या चर्चेत आली असली, तरी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आपण विरोधी पक्षातच असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मोदी-सुळे भेटीनंतर सुरू झालेल्या NDA प्रवेशाच्या चर्चांना सध्या तरी राष्ट्रवादी खासदारांनी पूर्णविराम दिला आहे.
