‘ढेकर देऊन वक्फ बोर्डाचं बिल मांडलं आणि…’, वक्फ सुधारणा विधेयकावरून उद्धव ठाकरेंचा निशाणा
'आपण पाकिस्तानला इशारा देऊ शकतो. चीनला देऊ शकत नाही. अमेरिकेला तर नाहीच नाही. मग काय करायचं तर जे सुरू आहे ते भोगतोय. ते भोगत बसायचं. हे आपल्याला कळू द्यायचं नाही. कुठे तरी वेगळे विषय काढायचे.', आयात शुल्कावर ठाकरेंची प्रतिक्रिया
लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक काल मंजूर करण्यात आलं आहे. २८८ विरूद्ध २३२ मतांनी लोकसभेमध्ये हे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी काल लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर केलं होतं. तर आता राज्यसभेत हे विधेयक सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. ‘नुकतीच ईद झाली आहे. ईदवेळी या सर्वांनी ईदच्या मेजवाण्या झोडल्या. ढेकर देऊन वक्फ बोर्डाचं बिल मांडलं आहे. योगायोग आहे किरेन रिजिजू यांनी हे बिल मांडलं. रिजिजू यांनीच गोमांस खाण्याचं एकेकाळी समर्थन केलं होतं. त्यांनीच हे बिल मांडलं आहे. योगायोग किंवा ठरवून आणलेला योगायोग आहे.’, वक्फ सुधारणा विधेयकावरून उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ‘भाजप काय करते हेच कळत नाही. कधी सांगणार औरंगजेबाची कबर खोदणार, आणि त्यांची लोकं कुदळ फावडं घेऊन जातात, आणि मग म्हणतात अरे परत माती टाका. तसेच यांची लोकं म्हणतात मशिदीत जाऊन मारू. मग मारायला जातात त्यांना सांगतात हत्यार बाजूला ठेवा आणि सौगात ए मोदी घेऊन जा. लोकांना झुंजवायचं आणि आपल्या पोळ्या भाजायच्या भाजपने केलं आहे.’, असं ठाकरे म्हणाले.
