Udhav Thackeray : हिंदीचं वावडं नाही, …पण ही भाषिक आणीबाणी; हिंदीविरोधात उद्धव ठाकरेंचा घणाघात
'आम्ही कोणतीही सक्ती लादून घेणार नाही. आम्हाला सादरीकरण नको. आम्हाला हिंदी नकोच. हिंदी सर्वांना येते. कुणाला येत नाही. तुम्ही भाषा जबरदस्ती करणार का. आम्ही चालू देणार नाही', असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मनसेनंतर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडूनही हिंदी भाषासक्तीचा विरोध केला जात आहे. त्यामुळे मनसेनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेचा रोषही सरकारला सहन करावा लागणार आहे. यासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, जोपर्यंत हिंदी भाषा सक्ती मागे घेतली जाणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की राज्यात हिंदीची सक्ती होऊ देणार नाही तर सादरीकरणाची गरज नाही. हे दळण कशासाठी दळत आहात. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती, बटेंगे तो कांटेंगे. आता बाटेंगे आणि काटेंगे हे धोरण दिसतंय. जे काही चांगलं इतर भाषिकात आहे. त्यात मिठाचा खडा टाकला जात आहे. विषाचा खडा टाकला जात आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर आरोप केलाय.
पुढे ते असेही म्हणाले, हिंदी भाषेला विरोध नाही. हिंदीच्या सक्तीला विरोध आहे. मुंबईत हिंदी चित्रपटसृष्टी आहे. अनेक कलाकार महाराष्ट्रात मोठे झाले. महाराष्ट्रात हिंदी चित्रपट तुफान चालतात. आम्हाला हिंदीचं वावडं नाही. हिंदी सक्तीची याचा अर्थ कालांतराने एक निशाण, एक विधान म्हणजे मीच. एकाधिकारशाहीकडे यांची वाटचाल सुरू आहे. आता ते भाषिक आणीबाणी लादत आहे. ही भाषिक आणीबाणी असल्याचे त्यांनी म्हटलं.
