Vaishnavi Hagawane Case : तुम्ही सुज्ञ आहात… आरोपींच्या वकिलांनी केलेल्या आरोपांवर बोलताना वैष्णवीचे वडील ढसाढसा रडले अन् हात जोडून म्हणाले…
सासरच्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या वैष्णवीवर हगवणेंच्या वकिलांनी गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांना उत्तर देण्यासाठी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी पत्रकार परिषद घेत सर्व माहिती दिली.
हगवणेंच्या वकिलांमार्फत कोर्टामध्ये हागवणेंनी स्वतःला निर्दोष ठरवत मृत वैष्णवीच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडवण्यात आल्याचे पाहायला मिळाले. यासंदर्भात वैष्णवीच्या कुटुंबाना सवाल केला असताना त्यांनी पत्रकार परिषदेत हे सर्व आरोप खोडून काढलेत. ‘माझ्या मुलीवर काहीही शिंतोडे उडवतील. वकीलांना सांगायचं तुम्ही सुज्ञ आहात. तुम्हालाही मुलीबाळी असतील. एखाद्याच्या असाह्य मुलीवरती… माझी मुलगी तर गेलीच… पण ती मेल्यावर तिच्यावर शिंतोडे उडवू नका. तुम्हालाही मुलं असतील मुली असतील. पण माझ्या लेकराचं हे नका करू. एवढंच सांगायचं आहे’, असे आव्हान करत वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांना अश्रू अनावर झालेत. तर वैष्णवी हगवणे प्रकरणात समोर आलेल्या रिपोर्टनुसार, सहा ते सात दिवस तिला सलग मारहाण झाली. १० तारखेला आली होती तेव्हा आईला बोलली होती. मारहाण होतेय, छळ होतेय. पण नवऱ्याचा फोन आल्यावर तिला दुसऱ्या दिवशी जावं लागलं, अशी माहितीही वैष्णवीच्या घरच्यांनी दिली.
