Sangali : ‘या’ हत्तीणीसाठी ‘वनतारा’कडून 3 कोटींची ऑफर अन् किडनॅपिंगची प्रक्रिया सुरू… खळबळजनक आरोप काय?
सांगली जिल्ह्यातील तासगावच्या गौरी हत्तीणीसाठी वनताराकडून 3 कोटींची ऑफर आली होती, असा तासगाव पंचायतन संस्थांच्या विश्वस्तांचा खळबळजनक दावा आहे.
कोल्हापूरच्या नांदणीमठातील माधुरीची चर्चा राज्यभरात सुरू असताना एक खळबळजनक प्रकार समोर आलाय. वनतारासाठी सांगलीच्या तासगाव गणपती संस्थानच्या गौरी हत्तीणीला दोन ते तीन कोटींची ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट संस्थांच्या विश्वस्तांकडून करण्यात आला आहे. एका कथित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून गौरी हत्तीणीला अनफिट असल्याचे सर्टिफिकेट देण्याबरोबर, वनतारा संस्थेचे माध्यमातून दोन ते तीन कोटी रुपये मिळतील, अशी ऑफर देण्यात आल्याचा दावा गणपती पंचायतन संस्थानचे विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांनी केला आहे. तसेच हत्तीणीबाबत किडनॅपिंगची प्रक्रिया सुरू असल्याचा गंभीर आरोप देखील पटवर्धन यांनी केला आहे.
नांदणी मठाच्या माधुरी हत्तीच्या पार्श्वभूमीवर तासगावकरांच्या गजलक्ष्मी उर्फ गौरी हत्तीच्या संरक्षणासाठी येत्या संकष्टीपासून सह्यांची मोहीम देखील राबविण्यात येणार असल्याचं राजेंद्र पटवर्धन यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. तासगाव गणपती पंचायत संस्थानकडून गेल्या 40 वर्षांपासून गौरी हत्तीणीचा संभाळ केला जातोय. या पुढच्या काळात देखील तिचा देखभाल योग्य पद्धतीने होत राहील, असा विश्वास देखील राजेंद्र पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे. मात्र वनताराबद्दल केलेल्या पटवर्धनांच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.
