Vijay Wadettiwar | सरकार OBC जनगणनेला घाबरतंय? वडेट्टीवारांचा हल्लाबोल; जेल भरो आंदोलनाचा थेट इशारा!
देशात राष्ट्रीय जनगणना प्रक्रियेला सुरुवात झाली असताना, ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेची जोरदार मागणी करत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. तसेच, या मागणीसाठी पूर्व विदर्भात मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेबाबत सरकार नेमके कशाला घाबरत आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधानांनी पूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना ठेवला जावा, अशी मागणी त्यांनी केली. वडेट्टीवार यांनी आरोप केला की, सरकारने ओबीसी समाजाशी विश्वासघात केला असून स्वतंत्र जनगणना टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. “ओबीसींची वास्तविक लोकसंख्या समोर आली तर त्यांच्या हक्कांचा आणि प्रतिनिधित्वाचा प्रश्न अधिक ठळकपणे पुढे येईल, त्यामुळेच सरकार ही जनगणना टाळत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
यावेळी त्यांनी लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण, शिष्यवृत्ती, विकास निधी आणि इतर शासकीय योजनांमध्ये योग्य वाटा मिळावा, अशी भूमिका मांडली. “जितकी लोकसंख्या, तितकी भागीदारी” हेच आमचे धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी जनगणना प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. जनगणनेत सहकार्य न केल्यास गुन्हे दाखल होऊ शकतात, या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार यांनी सरकारला थेट इशारा दिला. “ओबीसींची स्वतंत्र जनगणना नसेल तर आम्ही आंदोलन करू. गरज पडल्यास जेल भरो आंदोलनही छेडू,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
या वक्तव्यानंतर ओबीसी जनगणनेचा मुद्दा पुन्हा एकदा राज्य आणि देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला असून, सरकार यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.