Womens World Cup 2025 : ऐतिहासिक विजय, भारतानं पहिल्यांदाच जिंकला महिला विश्वचषक 2025, असा केला चाहत्यांनी जल्लोष
भारतीय महिला संघाने 2025 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करत इतिहास घडवला आहे. भारताने पहिल्यांदाच विश्वचषक जिंकल्याने देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. फटाक्यांची आतषबाजी आणि चाहत्यांच्या जल्लोषाने हा ऐतिहासिक विजय साजरा करण्यात आला.
भारतीय महिला क्रिकेट संघाने 2025 च्या महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऐतिहासिक विजय नोंदवत पहिल्यांदाच विजेतेपदावर नाव कोरले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम लढतीत भारताने 52 धावांनी दणदणीत मात केली. हा विजय भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. या विजयानंतर देशभरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आणि मोठ्या संख्येने चाहते रस्त्यावर उतरून जल्लोष करताना दिसले. ज्या हॉटेलमध्ये भारतीय संघ थांबला होता, त्या कोर्टियार्ड हॉटेलबाहेरही चाहत्यांनी जोरदार सेलिब्रेशन केले. “बेस्ट मॅच एव्हर,” “इंडिया! इंडिया!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
अनेक चाहत्यांनी भारताच्या विजयाबद्दल पूर्ण विश्वास व्यक्त केला. 2025 हे वर्ष भारतासाठी खूपच लकी असून, या वर्षी भारत सर्व ट्रॉफी जिंकणार असल्याचा विश्वासही चाहत्यांनी व्यक्त केला. भारतीय महिला संघाचा हा ऐतिहासिक विजय खूप अभिमानास्पद आहे.
