राष्ट्रवादीच्या तिकीटावर पराभूत भाजपचा माजी आमदार शिवसेनेत

भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुखांकडून शिवबंधन बांधून घेतलं.

राष्ट्रवादीच्या तिकीटावर पराभूत भाजपचा माजी आमदार शिवसेनेत

मुंबई : राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढताना पराभूत झालेले भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी राष्ट्रवादीलाही सोडचिठ्ठी दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सानप यांनी शिवसेनेत प्रवेश (Balasaheb Sanap joins Shivsena) केला आहे.

विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतरही पक्षांतराची धामधूम सुरुच आहे. ऐन नरकचतुर्दशीला शिवसेनेत पक्षप्रवेशाने दिवाळी साजरी केली जात आहे. बाळासाहेब सानप यांनी ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुखांकडून शिवबंधन बांधून घेतलं.

बाळासाहेब सानप 2014 मध्ये नाशिक पूर्व मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर आमदारपदी निवडून आले होते. मात्र विद्यमान आमदार असूनही सानप यांना भाजपने यावेळी तिकीट नाकारलं होतं. त्यांच्याऐवजी मनसेमधून आलेल्या राहुल ढिकले यांना भाजपने तिकीट दिलं होतं. राहुल ढिकले हे माजी खासदार उत्तमराव ढिकले यांचे पुत्र आहेत.

तिकीट डावलल्याने नाराज झालेल्या सानप यांनी भाजपला अलविदा करत राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला होता. नाशिक पूर्व मतदारसंघातून त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवली. विशेष म्हणजे मनसेतून बाहेर पडलेल्या ढिकलेंना पाडण्यासाठी मनसेने या ठिकाणी उमेदवार न देता सानप यांना पाठिंबा दिला होता.

विधानसभा निवडणुकीत मात्र राहुल ढिकलेंकडून सानप यांना 12 हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे राष्ट्रवादीला रामराम ठोकत सानप यांनी सत्तेत सहभागी होणाऱ्या शिवसेनेची वाट धरली आहे. गेल्या महिन्याभरात सानप यांचा तिसऱ्या पक्षातला हा प्रवास (Balasaheb Sanap joins Shivsena) आहे.

कोण आहेत बाळासाहेब सानप?

बाळासाहेब सानप हे भाजपचे नाशिक महापालिकेतील पहिले महापौर ठरले होते. गेल्या वेळी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर सानप यांना विजय मिळाला होता.

‘विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आपण अपक्ष नगरसेवक पवन पवारची भेट घेतली व मदत करण्याची गळ घातली. पवन पवारने आपल्याला निवडणुकीत मदत केली असून, माझ्या विजयात त्याचा मोठा वाटा आहे’ अशी मुक्ताफळं बाळासाहेब सानप यांनी 2014 मधील विजयानंतर उधळली होती.

भाजपच्या 14 नगरसेवकांचा राजीनामा, बाळासाहेब सानपांसाठी कार्यकर्ते आक्रमक

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पवन पवारमुळेच आपण निवडून आल्याचा खुलासा सानप यांनी केल्याने त्यांच्या विजयावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. या कारणानेच त्यांचं तिकीट कापलं गेल्याची चर्चा होती.

भाजपच्या नगरसेवकांनी बाळासाहेब सानप यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांना उमेदवारी न मिळाल्याने नगरसेवकांनी निषेध करत राजीनामे दिले. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांच्या भावनाही अनावर झाल्या होत्या. अनेक महिलांनी सानप यांच्या कार्यालयात थेट रडण्यास सुरुवात केल्याने एकच गोंधळ उडाला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *