हे जरा अतिच झालं..; ‘सैयारा’च्या अभिनेत्यानेच केली प्रमोशन टीमची पोलखोल
'सैयारा' या चित्रपटातील एका अभिनेत्यानेच त्यांच्या पीआर टीमची पोलखोल केली आहे. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाविषयी प्रतिक्रिया देताना त्याने काहींची खिल्लीदेखील उडवली आहे. या अभिनेत्याने चित्रपटात अहानच्या वडिलांची भूमिका साकारली आहे.

मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’ या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात कमाईचा 500 कोटींचा टप्पा पार केला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर थिएटरमधील बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यात काही जण सलाइन लावून थिएटरमध्ये पोहोचल्याचं दिसलं तर काहीजण अक्षरश: थिएटरमध्येच बेशुद्ध होताना दिसले. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून जो प्रतिसाद मिळाला, तो खरा होता, असं दिग्दर्शकांनी स्पष्ट केलं होतं. परंतु आता याच चित्रपटातील एका अभिनेत्याने पीआर टीमची पोलखोल केली आहे. यामध्ये अहान पांडेच्या वडिलांची भूमिका साकारलेल्या वरुण बडोलाने लोकांच्या प्रतिक्रियांची खिल्ली उडवली आहे. ‘सैयारा’मध्ये अहान पांडे आणि अनित पड्डा यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत वरुण म्हणाला, “जेव्हा आम्ही या चित्रपटासाठी शूटिंग करत होतो, तेव्हा तो इतका हिट होईल याची जरासुद्धा कल्पना नव्हती. सर्वांना एवढंच वाटलं होतं की किमान प्रॉडक्शनचा खर्च कमाईतून निघू शकेल. परंतु प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर जो धमाका झाला, तो सर्वांनीच पाहिला. तेव्हा आम्हाला समजलं की हा चित्रपट सुपरहिट होणार आहे. खरं सांगायचं झाल्यास, मी अद्याप हा संपूर्ण चित्रपट थिएटरमध्ये बसून पाहिला नाही.”
View this post on Instagram
लोकांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया पाहून वरुण पुढे म्हणाला, “तिसऱ्या आणि चौथ्या दिवसापर्यंत या चित्रपटाची बरीच चर्चा सुरू झाली होती. मी इन्स्टाग्रामवर प्रेक्षकांचा उत्साह पाहत होतो. काहीजण त्यांच्या बांगड्या फोडत होते, तर काही जण जोरजोरात ओरडून रडत होते. मला असं वाटतं की प्रमोशनची टीम जरा जास्तच पुढे गेली आहे. एका व्हिडीओमध्ये प्रेक्षक आयव्ही ड्रीप (सलाइन) लावून थिएटरमध्ये पोहोचला होता. त्या लोकांना तर नक्कीच कंटेंट देण्यासाठी सांगितलं असेल. नशीब, लोकांचे पाय तुटले नाहीत आणि ते रांगत थिएटरमध्ये पोहोचले नाहीत.”
‘सैयारा’ने भारतात 300 कोटींपेक्षा आणि जगभरात 500 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. या वर्षातील हा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटातून अभिनेत्री अनन्या पांडेचा चुलत भाऊ अहान पांडेनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. पहिल्याच चित्रपटातून त्याने प्रेक्षकांवर विशेष छाप सोडली आहे.
