फक्त चालणं पुरेसं नाही! जपानमधली ‘ही’ खास टेक्निक वापरा आणि मिळवा दुप्पट फायदा!
रोज १०,००० पावलं चालणं ही आरोग्यासाठी चांगली सवय आहे, पण तीच एकमेव पर्याय नाही. जपानी शिकात्सू पद्धत केवळ पावलं मोजण्यावर नाही, तर शरीर आणि मनाच्या संपूर्ण आरोग्यावर लक्ष केंद्रित करते. त्यामुळे चालण्याचा खरा लाभ घ्यायचा असेल, तर ही पद्धत अवश्य आजमावून पाहा.

आपल्या आरोग्यासाठी चालणं हे एक उत्तम व्यायामाचं साधन मानलं जातं. अनेक लोक रोज १०,००० पावलं चालण्याचं लक्ष्य ठेवतात आणि त्यातून चांगला व्यायाम होतो, असं मानतात. मात्र, आता एक नवी जपानी पद्धत चर्चेत आली आहे, जी केवळ चालण्यापेक्षा अधिक प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. ही पद्धत ‘शिकात्सू’ (Shikatsu) किंवा ‘निप्पो डायकात्सू’ म्हणून ओळखली जाते आणि ती केवळ पावलं मोजण्यापेक्षा आरोग्याकडे व्यापक दृष्टिकोनाने पाहण्याची शिकवण देते.
१०,००० पावलं चालण्याची संकल्पना १९६५ मध्ये जपानमध्ये सुरू झाली. एका पेडोमीटर उत्पादनाच्या प्रचारासाठी हा आकडा ठरवला गेला होता. त्यावेळी वैज्ञानिक आधार नव्हता, तरीही हे लक्ष्य लोकप्रिय झालं आणि जगभर मान्यताही मिळाली. मात्र आज अनेक तज्ज्ञ सांगतात की, प्रत्येकासाठी १०,००० पावलं चालणं गरजेचं नाही आणि हे आरोग्यदायी परिणाम देईलच, याची खात्रीही नाही.
शिकात्सू किंवा ‘निप्पो डायकात्सू’ ही पद्धत केवळ शरीराच्या हालचालीवर लक्ष केंद्रित करत नाही, तर मन, श्वासोच्छ्वास, पोषण, आणि झोप या चार गोष्टींवरही भर देते. यामध्ये चालण्याच्या वेळेस श्वासावर लक्ष ठेवणं, विश्रांती आणि शरीराच्या स्थितीचा अभ्यास करणं याचा समावेश आहे. त्यामुळे तुम्ही कमी चाललात तरी जास्त फायदा होतो.
कसा मिळतो दुप्पट फायदा?
शरीरावर परिणाम करणाऱ्या हालचाली केवळ संख्येवर अवलंबून नसतात, तर त्यांच्या पद्धतीवर अवलंबून असतात. शिकात्सू पद्धतीमध्ये चालताना श्वास खोलवर घेणं, पायांच्या हालचालींवर लक्ष देणं आणि संपूर्ण शरीर संतुलित ठेवणं यावर भर दिला जातो. त्यामुळे स्नायूंवर योग्य ताण येतो, शरीराचा पोश्चर सुधारतो आणि मानसिक शांतीही मिळते.
आरोग्य तज्ज्ञांचं मत
आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, दिवसातून ७,००० पावलं योग्य पद्धतीने चालल्यास ती १०,००० पावलांपेक्षा जास्त फायदेशीर ठरू शकतात. मुख्य म्हणजे चालण्याच्या दरम्यान शरीरातली ऊर्जा कशी वापरली जाते, याचा विचार महत्त्वाचा आहे. शिकात्सू पद्धतीने चालल्यास सांधेदुखी, थकवा, पोश्चर खराब होणं यासारख्या समस्या टाळता येतात.
रोजच्या जीवनशैलीत या पद्धतीचा वापर कसा करावा?
तुमच्या चालण्याच्या वेळेस थोडा बदल करा मोबाईल न बघता, फोकस फक्त श्वासावर ठेवा. प्रत्येक टप्प्यावर शरीराचं संतुलन आणि हालचालींवर लक्ष द्या. दिवसभर १०-१५ मिनिटं अशा प्रकारे चालल्यास, केवळ शरीर नाही, तर मनालाही शांतता मिळते.
