Jyoti Malhotra : हा दानिश आहे तरी कोण? हेरगिरीच्या आरोपात अटकेतील ज्योती मल्होत्राशी त्याचे काय कनेक्शन?
Jyoti Malhotra And Danish : दानिश याला भारत सोडून जाण्याचा आदेश देण्यात आला आहे. ज्योती मल्होत्रा हिच्याकडे गुप्तहेर संघटना खोलात जाऊन चौकशी करत आहेत. तिने देशातील संवेदनशील माहिती पाकड्यांना पुरवल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याचे पुरावे पण उपलब्ध असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Danish Pakistan High Commission : हरियाणा राज्यातील युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला देशातील संवेदनशील माहिती पाकड्यांना पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तिला 17 मे रोजी अटक केली. न्यायालयाने तिला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पाकिस्तान अधिकाऱ्यांनी ती संवेदनशील माहिती पुरवत होती आणि पाकसाठी हेरगिरी करत असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्ताच्या इफ्तार पार्टीत ती सहभागी झाल्याचे आणि पाकिस्तानी अधिकारी दानिश याच्यासोबत गुप्तगू करतानाचे व्हिडिओ समोर आले आहेत. दानिश हा पूर्वीपासूनच भारतीय गुप्तहेर संघटनांच्या रडारवर होता. त्याच्या हालचाली संशयास्पद होत्या. त्याला 13 मे रोजीच ‘परसोना नॉन ग्राटा’ घोषीत करून देश सोडण्यास सांगितले.
पाकिस्तानची मुरीद ही ज्योती कोण?
ज्योती मल्होत्रा ही हरियाणातील हिस्सार येथील रहिवाशी आहे. ती सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. तिचा मोठा फॅन फॉलोइंग आहे. ‘ट्रॅव्हल विथ जो’ ही तिचे युट्यूब चॅनल आहे. त्याला 3.77 लाख सब्सक्राइबर्स आहेत. तर इन्स्टाग्रामवर 1.32 लाख आणि फेसबुकवर 3.21 लाख फॉलोअर्स आहेत. ज्योतीने ‘देसी-इंडो-जो’ नावाने सुद्धा तिने कंटेट तयार केला आहे.
तिचे पाक कनेक्शन उघड झाले. इतकेच नाही तर पाकिस्तानमध्ये तिच्यासाठी पायघड्या घालण्यात आल्याचे लक्षात आले. पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या मुलीपासून ते अनेक लष्करी अधिकाऱ्यांसोबत तिचे जवळचे संबंध पुढे आले. तर देशातंर्गत संवेदनशील माहिती तिने दिल्याचे पण तपासात समोर येत आहे. त्यामुळे तिच्यावर आतापासूनच देशाशी गद्दारी केल्याचा आरोप होत आहे. तिच्यावर BNS कलम 152 आणि अधिकृत गुप्तवार्ता कायदा कलम 3, 4 आणि 5 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तिच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधून संशयित माहिती उघड झाली आहे. तिने पाकच्या एजंटाला देशातील सुरक्षा स्थळांची माहिती पुरवल्याचे समोर येत आहे.
हा दानिश तरी कोण?
2023 मध्ये ज्योती पाकिस्तानला गेली होती. त्यावेळी व्हिसासाठी ती दिल्ली येथील पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयात पोहचली होती. तिची ओळख तेथील दानिश उर्फ एहसान-उर-रहीम याच्यासोबत झाली होती. या दोघांमध्ये जवळीक झाली. दानिश याच्या मदतीने ती पाकिस्तानात पोहचली. तिथे ती पाकिस्तानातील गुप्तहेरांच्या संपर्कात आली. दुसऱ्या यात्रेदरम्यान ती पाकिस्तानातील अली अहसान आणि शाकिर उर्फ राणा शहबाज सारख्या एजंटांच्या संपर्कात आल्याचे तपास यंत्रणांच्या चौकशीत समोर आले. ती या एजंटशी विविध सोशल अकाऊंटवरून संपर्कात असल्याचे उघड झाले आहे.
