मुख्यमंत्री फडणवीसांकडून ठाकरे बंधूंच्या वचननाम्याची चिरफाड, मुंबईत तुफान फटकेबाजी
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे, आज शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीने आपला वचननामा जाहीर केला आहे. या वचननाम्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार निशाणा साधला.

मुंबई महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, प्रचाराला देखील वेग आला आहे, दरम्यान आज शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीनं आपला वचननामा जाहीर केला. या वचननाम्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. ते कांदिवलीमध्ये आयोजित सभेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख मामू असा केला. आमचे मामू उद्धोजी आणि नव्यानेच पुन्हा एकदा प्रेम उफाळलेले राजजी यांनी या ठिकाणी एक वचननामा जाहीर केला. पहिल्यांदा तर मी एकच सांगू इच्छितो, वचननामा देण्याचा अधिकार हा फक्त बाळासाहेब ठाकरे यांना होता, असा हल्लाबोल यावेळी फडणवीस यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
आज जाहीर झालेला वचननामा नाही. तो वाचून नामा आहे. पण त्यांनी काय वाचलं हे त्यांनाही माहिती नाही. याच कारण आपण बघाल, एका वाहिनीने 2017 सालच्या यांच्या आश्वासनासंदर्भातील एक फॅक्ट चेक केला, आणि त्या फॅक्ट चेकमध्ये असं दिसलं की यांनी त्यावेळी जे पाच वचनं दिले होते, त्यातील एकही वचन यांना पूर्ण करता आलं नाही. मला आश्चर्य वाटतं जर आपल्याला खोटचं बोलायचं आहे तर तो वचननामा आईच्या चरणी कशाला ठेवायचा? मला असं कळलं की हे जेव्हा वचन नामा करायला बसले, तेव्हा ते आपापसात काही तरी बोलत होते. मग मी त्याची माहिती काढली तर ते त्या ठिकाणी काय बोलत असतील? ‘झुटोने -झुटोसे का सच बोलो, अरे भाई दो भाईओ का ऐलान हुआ सच बोलो. घर के अंदर झुटो की एक मंडी है, दरवाजे पर लिखा है सच बोलो’ अशी शेरोशायरी करत फडणवीस यांनी जोरदार टोलेबाजी केली.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर देखील निशाणा साधला. आता बघा ते दोन युवराज त्या ठिकाणी कुठला तरी शो करत होते. राहुल गांधींसारखी स्क्रिन लावली होती, राहुल गांधी सारख्या येरझऱ्या करत होते, काही तरी बोलत होते, आणि मला कोणीतरी सांगितलं की त्यांनी असं म्हटलं, मुंबईमध्ये चांगल्या प्रकारचे शौचालय देखील नाहीत. आता हे आम्हाला का विचारता, घरी जाऊन काकांना किंवा बाबांना विचारा. 25 वर्षांमध्ये मुंबईत शौचालय देखील का तयार झाले नाहीत? याचं उत्तर आम्ही द्यायचं, की बाबा आणि काकांनी द्यायचं? मात्र तुम्ही या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या आज जो वचननामा आला आहे, त्यात वचनही नाहीये आणि नामाही नाहीये. मला कोणीतरी म्हणालं कार्टूननिस्ट आणि कॅमेरामनची युती झाली, मी म्हणालो असं म्हणणं योग्य नाही. मग मला कोणी तरी असं म्हटलं की, कॅमेडियन आणि कॅमेरामनची युती झाली, मी त्यांना म्हटलं हे देखील योग्य नाही. कारण कोणाचा व्यावसाय काहीही असू शकतो, ही जी युती झाली आहे ती युती करप्शन आणि कन्फ्यूजची झाली आहे, अशा शब्दात फडणवीस यांनी हल्लाबोल केला आहे.
