नगरसेवक व्हायचंय राजे हो… कुठे सात नवरा बायको निवडणुकीच्या मैदानात तर कुठे गरोदर महिलेचा प्रचार दणक्यात…
Election 2026 : राज्यातील वेगवेगळ्या महानगर पालिकांच्या निवडणुकीत पती-पत्नी निवडणूक लढवताना दिसत आहे. तर कुठे गरोदर महिला निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली पहायला मिळत आहे.

राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तब्बल सहा दाम्पत्य निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा आणि अपक्ष अशा वेगवेगळ्या पक्षांकडून पती-पत्नी निवडणूक लढवत आहेत. पॅनल पद्धतीने निवडणूक होत असून चौघा उमेदवारांच्या पॅनलमध्ये पती पत्नी उमेदवाराच्या रिंगणात उतरले आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून सांगलीच्या प्रभाग 17 मध्ये नानासाहेब शिंदे आणि मयुरी शिंदे हे पती-पत्नी निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माजी महापौरांच्या पॅनल विरोधात त्यांची लढत होत आहे. हे दोघेही पती-पत्नी उच्चशिक्षित असून या पती-पत्नींचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे.
गरोदर महिला निवडणुकीच्या रिंगणात
कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मध्ये गीतांजली हवालदार या आठ महिन्याच्या गरोदर महिला उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. काँग्रेस पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आठ महिन्याच्या गरोदर अवस्थेत त्या घरोघरी पायी फिरून प्रचार करत आहेत. प्रचारासाठी होणाऱ्या सभांना देखील त्या हजेरी लावत आहेत. कोल्हापूरातील आणि प्रभागातील नागरिकांना आणि विशेषतः महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गीतांजली या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. या प्रचारात त्यांना त्यांचे पती महेश हवालदार यांची देखील साथ मिळताना दिसत आहे.
पती-पत्नी वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार
चंद्रपूर मध्येही एकाच घरात 2 पक्ष गुण्यागोविंदाने नांदत आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एम ई एल प्रभाग 3 मधून लोमेश उईके काँग्रेसचे उमेदवार आहेत, तर त्यांच्या पत्नी बेबीताई उईके या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार आहेत. त्यामुळे आता या जोडप्याची चर्चा रंगली आहे.
या दोघांचाही प्रचार जोरात सुरू आहे. कुणी कुठून लढावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असून कुटुंबावर काहीही परिणाम होणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. आता मतदार दोघांच्याही गळ्यात नगरसेवक पदाची माळ टाकतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर नागपूरमध्ये पतीने दुसऱ्या पक्षातून उमेदवारी दाखल केल्याने एका सुशिक्षित प्राध्यापक महिलेने चक्क माहेरी जाणे पसंत केले असल्याची माहितीही समोर आली आहे.
