Municipal Elections 2026 : भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी मोठी बातमी, गेम फिरला
मोठी बातमी समोर येत आहे, ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, भाजपमध्ये मोठा पक्ष प्रवेश होणार आहे. पक्ष प्रवेशापूर्वी नेत्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर देखील गंभीर आरोप केले आहेत.

राज्यात सध्या माहालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारानं देखील चांगलाच जोर पकडला आहे. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान महापालिका निवडणुकीमध्ये यावेळी तिकीट न मिळाल्यानं सर्वच पक्षांमध्ये नाराजांची मोठी संख्या दिसून येत आहे. काही ठिकाणी नाराजांकडून पक्षाच्या सभांमध्ये गोंधळ घातला जात आहे, तर काही ठिकाणी नाराज इच्छूकांकडून नेत्यांच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सर्वात जास्त इनकमिंग सध्या भाजपमध्ये सुरू आहे. दरम्यान आता भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये काँग्रेसमधून मोठा पक्षप्रवेश होणार आहे.
अंबरनाथचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील हे आपल्या 12 नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. ऐन महापालिका निवडणुकीपूर्वी हा पक्षप्रवेश होत आहे. दरम्यान यावेळी बोलताना प्रदीप पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांनी माझ्याकडून ब्लॉक अध्यक्ष पदासाठी एक कोटीची मागणी केली असा आरोप प्रदीप पाटील यांनी केला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांना या युती संदर्भात आम्ही सांगितलं होतं, त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात आम्ही लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचं प्रदीप पाटील यांनी म्हटलं आहे. कारवाई केली हे अत्यंत चुकीचं आहे, काँग्रेसने निवडणुकीमध्ये एकदाही आम्हाला विचारलं नाही, आम्ही आमच्या जोरावर निवडून आलो असंही यावेळी पाटील यांनी म्हटलं आहे.
भाजपमध्ये इनकमिंग
दरम्यान काही दिवसांपूर्वीच राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्यावेळी देखील आणि आता महापालिका निवडणुकीच्या वेळी देखील इतर पक्षातून भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र त्यामुळे भाजपमधील ज्या इच्छूकांना तिकीट मिळालं नाही ते नाराज झाले आहेत.
