गुंड बंडू आंदेकरच्या कुटुंबातील व्यक्तींना महापालिकेचं तिकीट, अजितदादांची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले मोठा गुन्हा केला तर..
पुणे महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून यावेळी पुणे महापालिका निवडणुकीसाठी गुंड बंडू आंदेकर याच्या कुटुंबातील दोन व्यक्तींना तिकीट देण्यात आलं आहे, त्यावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं गुंड बंडू आंदेकर यांच्या कुटुंबातील व्यक्तीला तिकीट देण्यात आलं आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून बंडू आंदेकर याची भावजयी लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सून सोनाली वनराज आंदेकर यांना तिकीट देण्यात आलं आहे. दरम्यान बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीवर गंभीर आरोप आहेत, असं असताना देखील तिकीट दिल्यामुळे सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटावर जोरदार टीका सुरू आहे, यावर आता अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
समजा एखादा गुन्हेगार आहे, त्याने मोठा गुन्हा केला तर त्यात त्याच्या पत्नीचा काय दोष? मी काही तरी गुन्हा केला तर माझ्या पत्नीचा, मुलाचा, सूनाचा काय दोष आहे. मर्डर केला म्हणून अख्खं खानदान जबाबदार आहे? असं काही नाही. काही विकृती असते. ज्या काही याद्या आल्या आहेत, त्यात इतरांच्या याद्यात काही नावं कशी आहेत? आम्ही मित्र पक्षांना जागा सोडल्या. तेव्हा त्यांनी कुणाला उमेदवारी द्यायची हा त्यांचा प्रश्न आहे, असं यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान अजित पवार यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. माझ्याकडे पुरावे आहेत असं देखील त्यांनी म्हटलं होतं, यावरून वातावरण चांगलंच तापलं. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता, मी तेव्हाच फडणवीसांना म्हटलो होतो, अजित पवारांना महायुतीत घेताना विचार करा, असं त्यांनी म्हटलं. दरम्यान यावर देखील अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रवींद्र चव्हाण एका मोठ्या पक्षाचे नेते आहेत. त्यांना त्यांची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, असं यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे, तसेच त्यांनी यावेळी महापालिकेच्या कारभारावरून भाजपवर देखील जोरदार टीका केली आहे. त्यामुळे आता वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
