केडीएमसीच्या रिंगणात अपक्षांनी वाढवली महायुतीची धाकधूक, मतदारांचा कल कोणाकडे?
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत महायुतीमधील बंडखोरी आणि घराणेशाहीच्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानापूर्वी शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत कलहाचा फायदा कोणाला मिळणार, याचा सविस्तर आढावा.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. राज्यात सर्वत्र प्रचाराचा नारळ फुटताच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. महायुती, महाविकास आघाडी आणि मनसे अशा सर्वच पक्षांनी कंबर कसली असली तरी प्रामुख्याने महायुतीमधील अंतर्गत बंडखोरीने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण केली आहे. येत्या १५ जानेवारीला महापालिका निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. तर १६ जानेवारीला या महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे गुलाल कोण उधळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रचारात पक्षीय उमेदवारांपेक्षा बंडखोर उमेदवारांनीच जास्त लक्ष वेधून घेतले आहे. कल्याण पूर्व आणि पश्चिम भागात शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील बंडखोरांनी आपापल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध शड्डू ठोकला आहे. यामुळे मतांचे विभाजन होऊन याचा थेट फायदा विरोधकांना मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्रमांक ६ आणि ७ मध्ये चुरस शिगेला पोहोचली आहे.
प्रभाग ७ मध्ये भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पत्नी हेमलता पवार यांच्या विरोधात शिवसेनेच्या बंडखोर गीतांजली पगार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निष्ठवंतांना डावलले जात आहे असा आरोप करत पगार यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. तर प्रभाग ६ मध्ये माजी महापौर वैजयंती घोलप आणि माजी नगरसेवक कस्तुरी देसाई यांच्यासमोर भाजपच्या चार बंडखोरांनी सुधीर वायले, सचिन यादवडे, नीता देसले आणि तृप्ती भोईर एकत्र येत स्वतःचे पॅनेल उभे केले आहे.
बंडखोरांचे पक्ष नेतृत्वावर गंभीर आरोप
निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या बंडखोरांनी पक्ष नेतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत. तर दुसरीकडे स्थानिक आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलून घराणेशाहीला खतपाणी घातले जात असल्याचा सूर उमटत आहे. तसेच, बाहेरून आलेल्या आयाराम-गयाराम उमेदवारांना तिकीट दिल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. कल्याण-डोंबिवलीतील यावेळची निवडणूक केवळ सत्तास्थापनेसाठी नसून ती राजकीय अस्तित्वाची लढाई बनली आहे. महायुतीमधील घटक पक्षांनी जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला असला तरी, स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांमध्ये असलेला असंतोष आता उघडपणे रस्त्यावर आला आहे.
मतदारांमध्येही संभ्रमाचे वातावरण
विशेषतः कल्याण पश्चिम आणि पूर्व भागांत ज्या प्रकारे निष्ठवंतांना डावलून उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे पक्षांतर्गत शिस्तीला तडे गेले आहेत. घराणेशाहीच्या मुद्द्यावरून मतदारांमध्येही संभ्रमाचे वातावरण असून, अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांनी स्थानिक विकास आणि निष्ठा हे दोन मुद्दे केंद्रस्थानी ठेवून प्रचारात आघाडी घेतली आहे. यामुळे अधिकृत उमेदवारांच्या विजयाचा मार्ग खडतर झाला असून मतांच्या विभाजनाचा मोठा फटका महायुतीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तर दुसरीकडे या बंडखोरीचा थेट फायदा मिळवण्यासाठी महाविकास आघाडीने अत्यंत सावध पवित्रा घेतला आहे. सत्ताधारी पक्षांमधील ही फाटाफूट आपल्या पथ्यावर पडेल, अशी रणनीती विरोधी पक्षांनी आखली आहे. प्रभाग ६ आणि ७ सारख्या संवेदनशील प्रभागांमधील लढतींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. येथे केवळ उमेदवारांचे भवितव्यच नव्हे, तर स्थानिक बड्या नेत्यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. त्यामुळे आता मतदारांचा कल हा पक्षाच्या चिन्हाकडे असणार की बंडखोरांच्या बंडखोरीला याचे उत्तर १६ जानेवारीच्या निकालातून स्पष्ट होईल. मात्र, सध्यातरी कल्याण-डोंबिवलीच्या राजकीय आखाड्यात पक्षीय निष्ठा आणि व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे.
