ऐन दिवाळीत फटाक्यांवरुन तुफान राडा, दोन गट भिडले, CCTV मध्ये थरार कैद
कल्याणजवळच्या मोहने परिसरात दिवाळीच्या फटाक्यांच्या स्टॉलवरून सुरू झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या हाणामारीत झाले. यात दोन गटांमध्ये जोरदार दगडफेक, तोडफोड झाली आणि ४-५ जण जखमी झाले.
कल्याण जवळच्या मोहने परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास मोठा राडा झाला. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दिवाळीनिमित्त लावलेल्या फटाक्यांच्या स्टॉलवरून सुरू झालेल्या एका किरकोळ वादाने रौद्र रूप धारण केले. यानंतर पाहता पाहता दोन गट एकमेकांना भिडले. या वेळी परिसरात तुंबळ हाणामारी, जोरदार दगडफेक आणि मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली. यात ४ ते ५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
हाणामारीमुळे मालमत्तेचे नुकसान
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कल्याणमधील दोन गटांमध्ये फटाक्यांच्या स्टॉलवरून किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. दोन गटांमधील वैयक्तिक वाद विकोपाला गेला. यानंतर त्याने सार्वजनिक हाणामारीचे स्वरूप घेतले. काही क्षणातच दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाली. यामुळे परिसरातील काही मालमत्तेचे नुकसानही करण्यात आले. या हाणामारीत जखमी झालेल्या चार ते पाच जणांवर जवळच्या रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.
या घटनेची सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हा संपूर्ण संघर्ष मोहने पोलीस चौकीच्या अगदी जवळच्या परिसरात घडला. पोलीस चौकी जवळच इतकी मोठी दगडफेक आणि हाणामारी होत असताना काही काळ तणाव वाढला होता, ज्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेच्या वेळी परिसरात भीतीचे आणि तणावपूर्ण वातावरण पसरले होते.
म्हणून अनर्थ टळला
यानंतर कल्याण खडकपाडा पोलीस स्टेशनमधील मोठा पोलीस फौजफाटा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी त्वरित आणि हस्तक्षेप करत जमावाला पांगवले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी त्वरित पाऊले उचलल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
परिसरामध्ये अजूनही तणाव
सध्या मोहने परिसरात तणावपूर्ण शांतता असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली गेली असली तरी, परिसरामध्ये अजूनही तणाव जाणवत आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, पुढील तपास खडकपाडा पोलीस करत आहेत. दोन्ही गटांतील सहभागी आरोपींना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.