Chagan Bhujbal : मुलाच्या तोंडावरून हात फिरवला, भुजबळांचे डोळे पाणावले, लातूरमध्ये भरत कराड यांच्या कुटुंबाला भेटल्यानंतर सरकारला केलं मोठं आवाहन
Chagan Bhujbal appeal to government : ओबीसी आरक्षणाचा लढा सुद्धा तीव्र होताना दिसत आहे. मराठा आरक्षण जीआरवरून मंत्री छगन भुजबळ संतापलेले आहेत. आज त्यांनी लातूर येथे जाऊन भरत कराड यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

आज मंत्री छगन भुजबळ यांच्यातील आजोबाचे दर्शनही उभ्या महाराष्ट्राला घडलं. मंत्र्यांच्या आडून दबलेला एक सामाजिक नेता, संवेदनशील नेता अश्रूंचा बांध तोडताना राज्यानं पाहिलं. एरव्ही करारी वाणी, पल्लेदार संवाद आणि बेधडक भाषणासाठी भुजबळ ओळखले जातात. शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा, रांगडा शिवसैनिक आणि ओबीसींची बुलंद तोफ अशी काही भुजबळांची देहबोली आहे. हम जहाँ से खडे, तिथूनच सभेला सुरुवात असे भुजबळांचं व्यक्तिमत्व. पण लातुर येथे भरत कराड यांच्या कुटुंबाला भेट देताना आणि त्यांच्या मुलांना मांडीवर घेताना भुजबळांना एकाएक गलबलून आलं. त्यांच्या हृदयाला कोण पाझर फुटला. देह थरथरला. घरातील स्त्रीया रडू लागल्या, मुलं कावरीबावरी झाली आणि भुजबळांनी त्यांना जवळ धरलं. त्यावेळी त्यांनाही रडू अनावर झालं. आपल्या रुमालानं त्यांनी मुलांचे डोळे पुसले. ओबीसी लढ्यात आज राग नव्हता. तर हळहळ होती. ओबीसी आरक्षण बचाव लढ्यात आजच्या चित्राने भुजबळ भावनिक झाले. त्यांनी सरकारला मोठं आवाहन केलं.
ओबीसी आरक्षणाचा लढा आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. ओबीसी नेते मराठा आरक्षण जीआरवरून संतापले आहेत. त्यात मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारवर विश्वासात न घेतल्याचा आरोप केला आहे. त्यांनी आज मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केलीच, पण त्याचवेळी मराठा समाजातील धुरणीने आरक्षणावर बोलते होण्याची गरज व्यक्त केली. तर आज त्यांनी लातूर येथे जाऊन भरत कराड यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
वागंदरी येथे अनेकांना अश्रू अनावर
लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील भरत महादेव कराड या तरुणाने ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्त मांजरा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याचं त्याच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. आज भुजबळांचा येवला येथे नियोजीत दौरा होता. पण त्यांनी तो रद्द करत लातूरकडे धाव घेतली. आज सकाळीच भुजबळ या कुटुंबाला धीर देण्यासाठी गावात दाखल झाले. त्यावेळी वातावारण शोकाकूल होते. सरकारने जीआर काढताना सरकारनं आपल्याला विश्वासात घेतला नसल्याचा दावा भुजबळांनी पुन्हा केला.
आमचं आरक्षण देऊ नका
यावेळी भुजबळांनी ओबीसीचं आरक्षण मराठ्यांना न देण्याचं आवाहन केलं. मराठ्यांना त्यांचं 10 टक्के स्वतंत्र आरक्षण देण्यात आलं आहे. मग त्यांना आता ओबीसीतून आरक्षण कशाला हवं असा सवाल त्यांनी केला. सरकारने जीआर काढताना विश्वासात घेतलं नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. या भेटीत त्यांनी कराड कुटुंबियांना काही मदत केल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री धनंजय मुंडे हे पण उपस्थित होते.
