Raj Thackeray : पन्नास खोके…. पन्नास खोके म्हणजे किती? राज ठाकरेंनी पोलखोल करत थेट आकडाच सांगितला
त्यावर संजय राऊत चटकन बोलले भ्रष्टाचारातून, घोटाळ्यातून. राज ठाकरे बोलले बरोबर ना, 'म्हणजे बँकेतून लोन तर नव्हतं ना घेतलं. त्यामुळे भ्रष्टाचारावर कोणी बोलायचं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत आज प्रसिद्ध झाली आहे. प्रसिद्ध सिने दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मुलाखत घेण्यात आली आहे. राज आणि उद्धव ठाकरे राज्य कारभार तसेच मुंबईच्या वर्तमान स्थितीवर या मुलाखतीत बोलले आहेत. मराठी माणसाच्या मुद्यावर सुद्धा त्यांनी आपले विचार मांडले आहेत. चारवर्षांपूर्वी शिवसेना फुटली. दोन गट पडले. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे. एकनाथ शिंदे यांच्याकडे आज अधिकृत शिवसेना आहे. 2022 साली एकनाथ शिंदे बाहेर पडले, तेव्हा 40 आमदार त्यांच्यासोबत होते. या आमदारांना 50-50 कोटी दिल्याचा आरोप होतो.
त्यावर राज ठाकरे बोलले आहेत. संजय राऊतांनी राज ठाकरेंना प्रश्न विचारला. भाजपने आरोप केलाय की, मुंबई महापालिकेत 3 लाख कोटींचा भ्रष्टाचार झाला. महापालिकेकडे एवढे पैसे असतात का? आणि जर एवढे पैसे पालिकेत असतील तर हे आमदार 50-50 कोटींना का पळून गेले?
त्यावर राज ठाकरे बोलले, “एक मिनिट… मला त्या गोष्टीबद्दल जरा बोलायचं आहे. ते जे चालू होतं ना पन्नास खोके, पन्नास खोके, पन्नास खोके… मला वाटतं लोकांना नीट समजावून सांगणं गरजेचं आहे. हे पन्नास खोके, पन्नास खोके हा विनोदाचा भाग नाही. पन्नास खोके म्हणजे पन्नास कोटी रुपये झाले… 40 आमदार म्हणजे 2 हजार कोटी झाले… हे पैसे कुठून आले? कसे आले?”
त्यावर संजय राऊत चटकन बोलले भ्रष्टाचारातून, घोटाळ्यातून. राज ठाकरे बोलले बरोबर ना, ‘म्हणजे बँकेतून लोन तर नव्हतं ना घेतलं. त्यामुळे भ्रष्टाचारावर कोणी बोलायचं?’
हे सगळं हवं आहे यात दुमत नाही
“आज जर तुम्ही पाहिलं तर सगळीकडं रस्ते खोदलेत. जिथं जावं तिथं रस्ते खोदलेत, मोठमोठय़ा इमारती उभ्या राहतायत. मेट्रो असेल, काही ठिकाणी पूल असेल. हे सगळं हवं आहे यात दुमत नाही. पण एका वेळी ते सगळं काढलेलं आहे. काही तारतम्य असायला पाहिजे. मुंबईच्या खर्चाचाही ताळमेळ बसवला गेला पाहिजे. नाहीतर आतासारखी परिस्थिती ओढवते. मुंबईकर म्हणून तुम्ही जो कर भरता, त्याच्यासमोर तुम्हाला काय मिळतं” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
