Uddhav Thackeray: शिवसेना का फोडली? उद्धव ठाकरेंच्या त्या दाव्याने खळबळ..म्हणाले महाराष्ट्र…
Uddhav Thackeray-Raj Thackeray Joint interview: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीने राजकीय वातावरण तापवले. विविध विषयांवर ठाकरे बंधुंनी रोखठोक भूमिका मांडली. त्याचवेळी शिवसेना फोडण्यामागची ती गोटातील बातमी उद्धव ठाकरे यांनी सांगितली.

Uddhav Thackeray on Shivsena Split: मुंबई महानगरापालिका निवडणुकीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीने राजकीय स्फोट घडवला. विकासापासून ते मुंबई तोडण्यापर्यंत आणि शिवसेना फोडण्यापर्यंत अनेक विषयांवर दोन्ही बंधुंनी रोखठोक भूमिका मांडली. शिवसेना फोडण्यामागची कारणं काय आहेत, याचा यापूर्वीही ऊहापोह झाला आहे. अनेक सभांमधून उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य केले आहे. पण या संयुक्त मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना फोडण्यामागील एक मोठे कारण समोर आणले आहे. ती गोटातील बातमी ठाकरे यांनी सांगितली.
का फोडली शिवसेना?
शिवसेना ज्या पद्धतीनं त्यांनी फोडली. त्यामागचा हेतू काय आहे? राजकारणात पक्षांतरं होतात. इथली माणसं तिकडं जातात. पण पक्ष संपवणं, पक्षाचं चिन्ह काढून घेणं. त्याची मान्यता जवळपास रद्द करणं. अस्तित्वचं नष्ट करणं. मराठी माणसाची ताकद तोडून फोडून काढणं हे काय दर्शवतं? असे एकामागून एक प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले. त्याचवेळी शिवसेना फोडण्यामागील छुपे कारण काय याविषयीचा दावा केला.
मराठी माणसाची ताकद तोडून फोडून काढणं हे काय दर्शवतं? ठीक आहे. राजकारणात युत्या होतात. आघाड्या होतात. आघाड्या तुटतात. युत्या तुटतात. पुन्हा पक्ष एकत्र येऊ शकतात. पण पक्ष संपवणं हा कोणता प्रयोग? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दुबळा करण्यासाठीच शिवसेना तोडल्याचा दावा केला. मराठी माणसांचं प्रतिनिधित्व करणारी संघटनांच संपवली तर या प्रश्नावर कोणीच बोलणार नाही असे सूतोवाच त्यांनी केले.
राज ठाकरे यांचा दावा काय?
मुंबई वेगळी करणं, गुजरातनं मागणं असं जे वातावरण होतं, तेच आज आहे. मुंबई वेगळी करणं ही ज्यांची इच्छा आहे. तेच केंद्रात आहेत. राज्यातही तेच आहेत आणि महानगरपालिकांमध्येही तेच सत्तेत आले तर मला असं वाटतं की, मराठी माणूस काहीच करू शकणार नाही. या सगळ्या गोष्टींकडे हतबलतेने पाहणं हे आमच्याकडून होणार नाही. म्हणून आम्ही एकत्र आलो असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मराठी माणूस, मराठी अस्मिता, संस्कृती आणि मुंबई वाचवण्यासाठी एकत्र आल्याचे सूतोवाच राज ठाकरे यांनी केलं. दोन्ही बंधु गेल्यावर्षी मे महिन्यात एकत्र आल्यानंतर आता त्यांची ही पहिली संयुक्त मुलाखत आहे. तर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांची संयुक्त संभा होणार आहे. त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
