Ambadas Danve: मुदतवाढीचा खेळ किती दिवस? पुणे जमीन घोटाळ्याप्रकरणी पार्थ पवारांवर कारवाई केव्हा? अंबादास दानवेंच्या या चार सवालांनी सरकार अडचणीत
Ambadas Danve Big Question: मुंढवा येथील शासकीय जमीन घोटाळ्याप्रकरणात पार्थ पवार यांच्यावर कारवाईस चालढकल होत असल्याने विरोधक संतापले आहेत. त्यांनी आता सरकारच्या भूमिकेवरच सवाल उपस्थित केला आहे. अंबादास दानवे यांच्या चार सवालांनी सरकार अडचणीत आले आहे.

पुण्यातील मुंढवा आणि नंतर कोरेगाव पार्कमधील जमीन घोटाळ्याने (Pune Land Scam)लँड माफियांना राजकीय वरदहस्त असल्याचा दावा मजबूत झाला. मुंढवा जमीन घोटाळ्यात तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची कंपनी अमेडिया सापडली आहे. याप्रकरणात पार्थ पवार यांच्यावर अद्यापही कारवाई न झाल्याने दाल में कुछ काला नही, तर अख्खी दाळच काळी असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. याप्रकरणात समितीचा फार्स आणि चौकशीचा ड्रामा सुरू असून पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी चार मोठे सवाल केले आहेत. त्यामुळे सरकार अडचणीत आले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोर्टातच हा चेंडू टोलावला आहे. त्यांच्या या सवालांना आता सरकार काय उत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंढवा जमीन घोटाळ्यात आतापर्यंत शीतल तेजवानी आणि अमेडिया कंपनीचे एक टक्का भागीदार असलेले द्विगविजय पाटील यांच्यावर कारवाई झाली आहे. तर इतरही सहआरोपींवर कारवाई झाली आहे. पण 99 टक्क्यांचे मालक असलेले पार्थ पवार यांच्याबाबत यंत्रणा मात्र मूग गिळून आहेत. हा व्यवहार रद्द झाला असला तरी मुद्रांक शुल्कापोटी 42 कोटी भरण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे ही मोठी रक्कम जो व्यवहार रद्द केला त्यापोटी भरण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ही रक्कम भरण्यासाठी सारखी मुदतवाढ देण्यात येत असल्याने विरोधक संतप्त झाले आहेत.
अंबादास दानवे यांचे चार सवाल
उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी या जमीन व्यवहार प्रकरणात चार मोठे सवाल केले आहेत. त्यांनी सोशल मीडिया X हँडलवरून हे सवाल विचारले आहेत. पुण्याच्या जमीन प्रकरणात शीतल तेजवानीला अखेर अटक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे जी, या प्रश्नांची उत्तरे जनता मागते आहे असे ट्विट त्यांनी केले आहे.
पुण्याच्या जमीन प्रकरणात शीतल तेजवानीला ‘अखेर’ अटक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे जी, या प्रश्नांची उत्तरे जनता मागते आहे..
१. जमीन देणारी व्यक्ती अटकेत असेल तर मग घेणाऱ्या व्यक्तीला, त्याच्या पार्टनरला अटक का नाही? २. पार्थ पवार प्रकरणात कंपनीने उत्तर…
— Ambadas Danve (@iambadasdanve) December 4, 2025
१. जमीन देणारी व्यक्ती अटकेत असेल तर मग घेणाऱ्या व्यक्तीला, त्याच्या पार्टनरला अटक का नाही?
२. पार्थ पवार प्रकरणात कंपनीने उत्तर देण्यासाठी अजून किती दिवस ‘मुदतवाढ-मुदतवाढ’ खेळणार आहात?
३. अमेडिया कंपनीत केवळ १ टक्का भागधारक दिग्विजय हा ९९ टक्के भागधारक असलेल्या पार्थ पवारांच्या मर्जीशिवाय सायनिंग अथॉरिटी झाला का?
४. मुद्रांक शुल्क माफ करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे सरकार कधी जाहीर करणार?
ही शुल्क माफी राजकीय दबावाशिवाय होणे शक्य नाही महोदय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याची कल्पना नाही असे सांगणे, हे जनतेला शुद्ध वेडे बनवणे आहे. ते ही बहुमताच्या जोरावर, असा सणसणीत टोलाही अंबादास दानवे यांनी लगावला आहे.
