Sharad Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? वाढदिवसाला शरद पवार यांना खास गिफ्ट? पडद्याआड मोठी घडामोड काय?
Sharad Pawar-Ajit Pawar NCP: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? असा सवाल अधूनमधून विचारल्या जातो. त्याला कारणंही तसंच असते. कारण वेगळे होऊनही या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील, कार्यकर्त्यांमधील ऋणानुबंध कमी झालेले नाही. ते वरचेवर एकमेकांना भेटतात. सुख, दुःखात आवर्जून एकत्र येतात.

Rashatrawadi Congress Party: शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी वाढदिवस असतो. दिल्लीत सध्या डिनर डिप्लोपसी रंगली आहे. राजकारण, समाजकारण, उद्योग, क्रीडा जगतातील अनेकांनी स्नेहभोजनाला आवर्जून हजेरी लावली. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी पॉवर शो दिसून आला. अजितदादांनी पण या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का? याची चर्चा पुन्हा रंगली आहे. राष्ट्रवादीत उभी फुट पडली असली तरी कुटुंबात कोणतेही मनभेद झालेले नाही. दोन्ही नेते एकमेकांच्या कौटुंबिक कार्यक्रमात जातीनं हजेरी लावतात. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये ऋणानुबंध कमी झालेले नाही. ते वरचेवर एकमेकांना भेटतात. त्यावरून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे.
शरद पवार-अजितदादांमध्ये 20 मिनिटं चर्चा
काल अजितदादा हे दिल्लीत शरद पवार यांना भेटण्यासाठी आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहचले. दरम्यान दिल्लीत शरद पवार आणि अजितदादा पवार यांच्यात बंद दाराआड 20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही राष्ट्रवादी निवडणुकांमध्ये एकत्र येण्यासंदर्भात ही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या भेटीचा तपशील बाहेर आलेला नाही. पण निवडणुकांमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये एकत्र येण्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला हव्यात
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला हव्यात. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास संघटनेला फायदा होईल, ताकद वाढेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली. आमच्या बऱ्याच आमदारांची मागणी आहे की दादा आणि शरद पवार यांनी एकत्र यावे. आजच्या बैठकीत याविषयी चर्चा होईल, असे ते म्हणाले.
वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य
अजित पवार यांच्या मुलाचं लग्न झालं होतं तिथं पवार साहेब गेले नव्हते म्हणून ते एकत्र आले असतील. वाढदिवस असल्याने अजित पवार यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या असतील. दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे जो निर्णय घेतली त्याला आम्हाचा पाठिंबा असेल असे खासदार भास्कर भगरे म्हणाले.
शरद पवार पुन्हा राज्यसभेवर?
संसदेचं अधिवेशन सुरू असल्यानं सर्व खासदार शरद पवार यांना भेटले आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राजकारणाच्या पलिकडे कुटुंब असते. अजित पवार हे प्रत्येक वर्षी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतात आणि त्यावेळी कुटुंब एकत्र येते. आम्हाला काय वाटतं या पेक्षा शरद पवार यांना काय वाटत हे महत्वाचं आहे. त्यामुळं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. शरद पवार यांच राज्यसभेत असणं हे देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं आहे. आम्ही सगळ्या खासदारांनी त्यांना तुम्ही राज्यसभेत पाहिजे आहात अशी विनंती केली आहे. आमच्या पक्षाचा आकडा काय आहे हे महत्वाचं नाही. त्यामुळं पवार पुन्हा राज्यसभेत येत असतील तर सर्वपक्षीय लोक सहकार्य करतील असे खासदार नीलेश लंके म्हणाले.राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अदानी एकत्र गप्पा मारत बसले होते असे ऐकले. त्यांच्या एकत्र येण्याने राज्यातील प्रश्न सुटणार असतील तर चांगलं आहे, असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी लगावला.
