Eknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत वाद उफाळला, इच्छुक उमेदवाराचा पत्नीसह आत्महत्येचा इशारा
Eknath Shinde Shivsena : "मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत 20 पेक्षा जास्त जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांचा विजय होईल. नाशिक महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल"

महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी काही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी प्रचंड गोंधळ घातल्याचं दिसून आलं. टीव्हीवरच्या दृश्यामध्ये हे कार्यकर्ते नेत्यांना जाब विचारताना दिसले. खासकरुन छत्रपती संभाजी नगर आणि नाशिकमध्ये भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी आपसात कुरघोडी रंगल्याचं चित्र पहायला मिळालं. अनेकांना आपल्या भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाले. नाशिकमध्ये आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अंतर्गत वाद उफाळून आला आहे. नाशिकमध्ये भाजप-शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. युतीसाठी तिथे प्रयत्न झाले. पण युती होऊ शकली नाही. उलट नाशकात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली आहे. भाजपला दोघांनी मिळून बाहेर ठेवलं.
आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अंतर्गत वाद दिसला आहे, प्रभाग क्रमांक 31 मध्ये इच्छुक असलेल्या शिवा तेलंग यांनी पत्नीसह आत्महत्येचा इशारा दिला आहे. सोशल मीडियावर पत्र पोस्ट करून आत्महत्येचा इशारा दिला आहे. आपल्या आत्महत्येला अजय बोरस्ते, हेमंत गोडसे, विजय करंजकर, सुदाम ढेमसे जबाबदार राहतील, असा पत्रात आशय आहे. महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी पैशांची देवाणघेवाण करून तिकीट वाटल्याचा आरोप केला आहे. पक्षाकडून प्रभागात दोन जणांना AB फॉर्म देण्यात आल्याने झाला गोंधळ. सोशल मीडियावर पत्र पोस्ट केल्यानंतर शिवा तेलंग नॉट रिचेबल आहेत.
‘काहींना दुर्देवाने संधी देता आली नाही‘
“ही वस्तुस्थिती आम्ही स्वीकारतो. राजकीय जीवनामध्ये प्रत्येक उमेदवार निवडून यावा आणि संख्याबळ वाढवण्यासाठी काम करत असतो. एका जागेसाठी जर 10 इच्छुक असतील तर कोणातरी एकाला उमेदवारी द्यावी लागते. काहींना दुर्देवाने संधी देता आली नाही. 95 टक्के शिवसैनिक माघार घेऊन कामाला देखील लागले आहेत“ असं दादा भुसे म्हणाले. “युतीसाठी अगदी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न करत होतो. दुर्देवाने युती होऊ शकली नाही. मैत्रीपूर्ण लढती होतील याचा विश्वास आहे“ असा दादा भुसे यांनी विश्वास व्यक्त केला. “मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत 20 पेक्षा जास्त जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांचा विजय होईल. नाशिक महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल“ असं दादा भुसे यांनी सांगितलं.
