अजितदादा, आम्ही बोललो तर अडचण होईल, रवींद्र चव्हाणांचा मोठा सूचक इशारा
Ravindra Chavan Counterattack on Ajit Pawar: पुणे आणि पिंपरी चिंचवडसह राज्यातील अनेक महापालिकेत अजितदादांनी महायुतीतच वेगळी चूल मांडली आहे. तर आता अजितदादांच्या एका वक्तव्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीत ठिणगी पडली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजितदादांवर मोठा पलटवार केला आहे.

Ravindra Chavan Criticised Ajit Pawar: माझ्यावर 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला, पण तो सिद्ध झाला का, असा सवाल करत ज्यांनी माझ्यावर आरोप केले, मी त्यांच्यासोबतच सत्तेत आहे, असा भीमटोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. तर भाजपने पुण्यात कोट्यवधींच्या ठेवी मोडल्या. हा एक भ्रष्टाचार असल्याचा टोला त्यांनी स्थानिक भाजप आमदारांना आणि नेत्यांना लगावला. त्यावरून आता भाजप आणि दादांमध्ये शिलगली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जोरदार पलटवार केला आहे. तर त्यासोबतच तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एनडीए सरकारमध्ये काम करत आहात, याची आठवणही त्यांनी दादांनी करुन दिली.
विकासावर भाजपचा जोर
पुण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी त्यांनी भाजपच्या काळातील विकास योजनांची उजळणी मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात केंद्रात असलेलं एनडीए सरकार आणि राज्यातले महायुती सरकार हे गतिमान सरकार कसं असावं याचं उदाहरण सेट करत आहोत.कोरोनामुळे निवडणूक लांबणीवर गेल्या. आता ही निवडणूक होत आहे. मागील वर्षानुवर्ष पुण्यात ज्या गतिमान पद्धतीने नरेंद्र मोदींच सरकार आणि फडणवीस सरकार काम करत आहेत. पायाभूत सुविधांना गती दिली जात आहे. कोट्यवधी रुपये दिले जात आहे. महापालिकेच्या स्थापनाच्या वेळेपासून स्वप्न साकार करायचं असेल तर त्या दिशेने पावलं उचलली पाहिजे, असे रवींद्र चव्हाण म्हणाले.
पुणे महापालिकेत मेट्रोचा ठराव महापालिकेत झाला त्यानंतर केंद्र आणि राज्यात सत्ता असताना सुधा महाविकास आघाडीला मेट्रो सुरू करता आले नाही त्यांनी चालू केलेच नाही. त्यांना करायचे नव्हते त्यांनी सगळं काही केलं नाही, असा आरोप चव्हाण यांनी केले. मोदींचा सरकार आल्यावर मेट्रो सुरु झाली ३३ किलोमीटरचे मेट्रो जाळं झालं आहे. येणाऱ्या काळात संपूर्ण पुणे शहरात मेट्रोच जाळ पसरवणार आहे. अनेक प्रकल्प फार गरजेचे आहेत. सार्वजनिक काम झालं पाहिजे. इलेक्टीक बस घेण्याचा निर्णय भाजपने केले आहेत.पुण्यातली वाहतूक कोंडू सुटू शकते. पुण्यातील सगळे विषय सोडवणार असल्याचे चव्हाण यांनी आश्वासन दिले.
खुद के गिरेबान में झाँक के देखिए
ज्यांनी ज्यांनी माझ्यावर 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्या सगळ्यांसोबत मी आज सरकारामध्ये बसलोय ना, असे अजित पवार यांनी म्हटले होते. त्यावर रवींद्र चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. माध्यमांनी त्यांना याविषयी विचारले असता, खुद के गिरेबान में झाँक के देखिए, आम्ही जर बोलायला लागलो तर अजितदादांना अडचण होईल असे चव्हाण म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात तुम्ही काम करत आहे.त्याला तुम्ही नाकारात आहात का? असा सवाल रवींद्र चव्हाण यांनी केला.
