वृद्धाश्रमात फुलला ‘माहेरवाशीण’ सोहळा, आजींचही दणक्यात ‘न्यू ईअर’ सेलिब्रेशन

| Updated on: Jan 01, 2026 | 12:27 PM

नवी मुंबईतील वृद्धाश्रमातील आजींना आरबीजी फाउंडेशनच्या मधुरा गेठे यांनी 'माहेरची साडी' वाटून आनंद दिला. 'थर्टी फर्स्ट'च्या दिवशी आजीबाईंनी जुन्या आठवणींत रमून, माहेरची उब अनुभवली. प्रत्येक आजीला आवडत्या रंगांच्या दोन साड्या मिळाल्याने त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. हा सामाजिक उपक्रम आजींसाठी एक अविस्मरणीय क्षण ठरला.

जुनं वर्ष सरताना त्याच्या आठवणी जागवत आपण सगळ्यांनीच नव्या वर्षाचं, 2026 दणक्यात स्वागत केलं. कोणी घरी बसून कुटुंबियांसोबत तर कोणी बाहेर हॉटेल, रिसॉर्टला जाऊन आपापल्या पद्धतीने जल्लोष करत सरत्या वर्षाला निरोप दिला आणि आशा-अपेक्षांनी भरलेल्या नव्या वर्षाचं बाहू पसरून स्वागत केलं. मात्र काही जण असेही होते, ज्यांच्यासोब आप्त कोणीच नाहीत, ते कसे नववर्षाचं स्वागत करणार ? त्या व्यक्ती म्हणजे वृद्धाश्रमात राहणाऱ्या महिला, त्यात काही आजीबाईंचाही समावेश. त्यांच्यासाठीच खास नववर्षाच्या सेलिब्रेशन केलं ते आरबीजी फाउंडेशन’च्या मधुरा गेठे यांनी. त्यांनी आपलेपणाने आजींसाठी सेलिब्रेशनची तयारी तर केलीच पण त्यांच्यासाठी खास ‘माहेरची साडी’देखील दिली.

आजीबाई जमल्या जुन्या आठवणीत…

सगळीकडे ‘थर्टी फर्स्ट’चा गरमागरम माहोल असताना, एका वृद्धाश्रमातील साऱ्या आजीबाई ‘माहेरवाशीण’ झाल्या अन् चक्क दोन-चार तास आपल्या हक्काच्या माहेरच्या जुन्या आठवणींत रमल्या. तेव्हा काही जणींच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या, पण ‘आरबीजी फाउंडेशन’च्या मधुरा गेठेंचा आपलेपणा पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हास्यही आलं. एका डोळ्यात अश्रू तर चेहऱ्यावर हसू असा नयनरम्य सोहळ्याचं सर्वांना साक्षीदार होता आलं.

माहेरच्या साडीतून दिली आपलेपणाची ऊब

हा योग जुळून आला होता, नवी मुंबईमध्ये कार्यरत आरबीजी फाउंडेशनच्या अध्यक्ष मधुरा गेठे यांच्यामुळे. विशेष म्हणजे, या आजीबाईंना खरोखरीच माहेरची ऊब देण्यासाठी मधुरा गेठेंनी साऱ्या जणींना ‘माहेरची साडी’ दिली. तेही प्रत्येक आजींना हव्या त्या रंगाच्या, डिझाइनच्या दोन-दोन साड्या निवडता आल्या. याक्षणी आजीबाईंच्या डोळ्यांमध्ये कौतुकाचे हसूही लपून राहिले नाही.

वृद्धाश्रमातल्या सगळ्या आज्जीबाई बुधवारी सकाळी छान तयार होऊन आल्या होत्या. वृद्धाश्रमात येण्यामागची प्रत्येकीची कहाणी निराळी, दुःखही वेगळे. पण नव्या वर्षाला सामोरे जाताना, या आपुलकी, मायेने भरलेला हा कार्यक्रम सगळ्याच आजीबाईनी चांगला फुलवला. आरबीजी फाउंडेशन आणि मधुराताई गेठे यांच्याप्रती सगळ्या आजीबाईंनाी कृतज्ञता तर व्यक्त केलीच; पण लाख मोलाचे आशीर्वादाचे धनही दिले.

या सोहळ्याबाबत बोलताना मधुरा गेठे यांनी आपल्या भावना मांडल्या. त्या म्हणाल्या, ‘’आयुष्याच्या प्रत्येक वळणावर महिलेला माहेरची ओढ असते. ती ओढ उतारवयातही आठवणींत ओढते आणि व्याकूळ करते. माहेरचा आनंद आजीबाईंच्या चेहरा यावा, तो टिकून राहावा, या कौटुंबिक भावनेतूनच आम्ही एकमेकांशी बोलत होतो. त्यातून प्रत्येकजणी आज काही तास का होईना पण माहेरी आले, असे वाटले. यानिमित्ताने केक कापून सरत्या वर्षाला निरोप दिला आणि नववर्षाचे स्वागत झाले. याचेही समाधान आम्ही आज वाटून घेतलं.” असं त्यांनी नमूद केलं.

आजींसोबत चिमुरडयांचीही धमाल…

वृध्दाश्रमात रंगलेल्या या सोहळ्यात आजीबाईंसोबत चिममुरडेही उत्साहाने सहभागी झाले आणि एकाच वेळी आजी, आजोबा आणि नातवंडांचा गोतावळाच पाहायला मिळाला. चॉकलेट आणि केक कापून या बालगोपाळांनी नाताळचे सेलिब्रेशन केले. या सगळयांच्या आनंदाने कार्यक्रमाला कौटुंबिक साज चढला.

 

Published on: Jan 01, 2026 12:21 PM