Shivsena-BJP: अखेर ठरलं…छत्रपती संभाजी नगरमध्ये भाजप शिवसेना एकत्र लढणार, कुणाच्या पदरात किती जागा? फॉर्म्युला काय ठरला?
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Election 2026: अखेर शिंदे शिवसेना आणि भाजपच्या घोडं एकदाचं युतीत नाहलं. गेल्या काही दिवसांपासून बैठकांची खलबत सुरू होती. पाच बैठका निष्फळ ठरल्या. पण युती व्हावी यासाठी दोन्ही पक्ष आग्रही होते. काय ठरला जागा वाटपाचा फॉर्म्युला, कुणाला मिळाल्या किती जागा?

Shivsena-BJP Alliance: मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप-शिंदेसेनेचं घोडं युतीत नाहलं. दोन्ही बाजूने चांगलीच रस्सीखेंच सुरू होती. जागा वाटपात एकमत होत नव्हते.गेल्या दोन दशकांपासून दोन्ही पक्ष खांद्याला खांदा लावून महापालिकेवर भगवा फडकवत होते. गेल्यावेळी एकत्रित शिवसेना आणि भाजपात वाद दिसले होते. त्यात एमआयएमने जोरदार मुसंडी मारली होती. विधानसभा आणि लोकसभेत एमआयएमचा झंझावत दिसला होता. पण यावेळी दोन्ही वेळा शिवसेनेने बाजू राखली. मराठवाड्यातील सर्वात मोठ्या महापालिकेसाठी दोन्ही पक्षात दिलजमाई झाली आहे. मग काय ठरला जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि कुणाला मिळाल्या किती जागा?
कुणाला मिळाल्या किती जागा?
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या ११५ जागांपैकी ८७ जागा भाजप-शिवसेना लढणार आहेत. यापैकी भाजप – ४५ तर शिवसेना – ४३ जागा लढवेल.बाकी जागांवर मुस्लिम बहूल मतदारांचं वर्चस्व असल्याने यावर आज खलबतं करण्यात येणार आहे. त्यासाठी भाजप सेनेची संयुक्त बैठकीला सुरुवात झाली आहे. दोन्ही पक्षांनी आता इतर पक्षांना आणि उमेदवारांना जागा वाटपावर चर्चा सुरू केली आहे. त्यामुळे आता कोणत्या प्रभागात कोणाला जागा सुटेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अंतिम फॉर्म्युल्यासाठी बैठक
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजप नेत्यांची आता खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या घरी बैठक सुरू झालेली आहे.या बैठकीत जागावाटप आणि अंतिम फॉर्म्युला ठरवला जाणार आहे.रात्री महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांनी युती होणार असल्याचे रात्री दीड वाजता सांगितले होते.स्थानिक नेत्यांची आज बैठक होईल आणि त्यानंतर निर्णय सांग जाहीर केला जाईल असं सांगितलं होतं. त्यानुसार आता बैठकीला सुरुवात झाली आहे.पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे,दोन्ही जिल्हाध्यक्ष,भागवत कराड हे या बैठकीला उपस्थित आहेत.
बंडोबांना थंड करण्याचे मोठे आव्हान
भाजपा आणि शिवसेनेकडे इच्छुकांची गर्दी जास्त असल्याने चर्चा सुरू आहे.कोणता प्रभाग सोडायचा आणि कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये ही आमची भूमिका आहे. इच्छुक जास्त आहेत आणि जागा कमी आहेत, म्हणून कोणती जागा घ्यायची आणि लढवायची ही चर्चा होणे गरजेचे आहे असे मंत्री संजय शिरसाट यांनी काल स्पष्ट केले होते. आता अंतिम चर्चा करुन युतीची घोषणा करण्यात येईल असे शिरसाट म्हणाले. इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याने या दोन्ही पक्षांना बंडोबांना थंड करण्याचे मोठे आव्हान समोर असेल.
