Marathwada Politics : बदल हवा तर चेहरा नवा; मराठवाड्यात दंगल दंगल; अनेक मतदार संघात काँटे की टक्कर

Marathwada Constituency : मराठवाडा ही संताची भूमी आहे. आता ती आंदोलनाची भूमी आणि परिवर्तनाची नांदी ठरली आहे. लोकसभा निकालात राज्यात सर्वात तीव्र प्रतिक्रिया मराठवाड्यातून उमटली. भाजपला खातं उघडता आलं नाही, शिंदे सेना तरली. लोकसभेनंतर विधानसभेला मराठवाड्यात राजकीय दंगल पाहायला मिळणार आहे.

Marathwada Politics : बदल हवा तर चेहरा नवा; मराठवाड्यात दंगल दंगल; अनेक मतदार संघात काँटे की टक्कर
मराठवाड्यात महाविकास आघाडी हिशोब चुकते करणार?
Follow us
| Updated on: Oct 09, 2024 | 3:33 PM

देशातील राजकीय बदलाचे वारे राज्यातून वाहते, हे अनेकदा महाराष्ट्राने अधोरेखित केले आहे. महाराष्ट्र हा चळवळीचा खंदा समर्थक राहिला आहे. तर आंदोलनाच्या रुपात मराठवाडा राज्याच्या केंद्रस्थानी आला आहे. मराठवाडा ही संताची भूमी, आता ती आंदोलनाची ऊर्जा झाली आहे. परिवर्तनाची नांदी ठरली आहे. लोकसभा निकालात राज्यात सर्वात धक्कादायक निकाल मराठवाड्याने दिला आहे. डबल इंजिन सरकार असताना भाजपला येथे खातं उघडता आलं नाही. तर शिंदे सेना एका जागेवर तरून गेली. महाविकास आघाडीला पाठबळ मिळाले. आता विधानसभेत मराठवाड्यात राजकीय दंगल पाहायला मिळणार आहे. राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणाऱ्या मराठवाड्यात परिवर्तनाची लाट कायम राहिल की यावेळी योजनांचा पाऊस पाडून महायुती लोकसभेचे मळभ धुवून काढेल, हे जनता जनार्दन ठरवेल. पण राज्यात अतिशय चुरशीच्या लढती होतील, हे सांगायला ना ज्योतिषाची गरज आहे ना राजकीय पंडिताची…

आंदोलनाच्या जमिनीचा सात-बारा कुणाच्या नावावर?

मराठवाड्यात मराठा आरक्षणाची हलगी वाजली. गेल्या दहा वर्षांत या मागणीने मराठ्यांच्या विराट शक्तीचे स्वरूप दाखवले. अन्यायाविरोधात पेटून उठण्याचे कसब मराठवाड्याच्या नसानसात भरलेले आहे. ते येथील जनतेला शिकवण्याची गरज पडली नाही. संतांनी येथील जमीन कसदार केलेली आहे. कमालीचा संयम आणि तितकाच आक्रमकपणा हा मराठवाड्याचा डीएनए आहे. दुष्काळाच्या छाताडावर जीवन फुलवणारे येथील हात यंदा कुणाच्या पारड्यात मतांचा कौल टाकतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 12 वर्षांपूर्वी मराठवाड्यात हिंदू-मुस्लीम असा वाद पेटवण्याचा प्रयत्न झाला. आता मराठा-ओबीसी आणि अन्य जाती असे उग्र जातीभेदाचे जळके लाकूड राजकीय पक्षांनी फेकले. भाजपला पुन्हा एकदा माधव पॅटर्न आठवला आहे. तर महाविकास आघाडी पत्ते हाताशी ठेऊन मैदानात उतरली आहे. मराठा आणि माधव पॅटर्नचा आपल्यालाच फायदा व्हावा यासाठी कसब पणाला लावत आहे. मराठा आंदोलन आणि ओबीसी आंदोलन कधी नव्हे ते एकमेकांविरोधात मराठवाड्याने पाहिले आहे. त्यामुळे आंदोलनांनी कसलेल्या या जमिनीवर विधानसभेचा सात-बारा कुणाच्या नावावर लिहिला जाईल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा

लोकसभेतून विधानसभेवर अचूक निशाणा

लोकसभेत महायुतीला मराठवाड्यातील जनतेने आडसरकर मास्तरांचा हाबाडा दिला. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांना आरोपांच्या फैरी झाडून शब्दबंबाळ केले. त्यात महाविकास आघाडीने सरशी केली. लोकसभेसाठी मराठवाड्यात 8 जागांवर लढत रंगली. त्यात एकच जागा महायुतीच्या खात्यावर जमा झाली. ऊर्वरीत 7 जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली. मराठवाड्यात विधानसभेच्या 48 जागा आहेत. मराठा आंदोलन आणि ओबीसी आंदोलन तापवत ठेवण्यात महायुती आणि महाविकास आघाडी दोघांना बऱ्यापैकी यश आले आहे. अनेक मुद्यांमध्ये हा फॅक्टर उजवा ठरणार हे राजकीय धुरणींना माहिती होते. त्यांनी त्याला हवा दिला. हा विस्तव, निखारे होऊन कुणाचे राजकीय करिअर जाळणार हे लवकरच समोर येईल.

तर या 48 विधानसभा मतदारसंघात लोकसभेच्या निकालाआधारे विचार केला तर महाविकास आघाडीचे पारडे जड असल्याचे दिसते. महाविकास आघाडीला 48 पैकी 34 विधानसभा मतदारसंघात लीड मिळाली होती. तर महायुतीने 12 मतदारसंघात वरचष्मा राखला. मराठवाड्यात एमआयएमची दमदार एंट्री झाली. एकदा आमदारकी, खासदारकी मिळवणाऱ्या एमआयएमला विधानसभेत एक तरी मतदारसंघ खेचून आणावा लागणार आहे. लोकसभेत छत्रपती संभाजीनगरमधील दोन विधानसभा मतदारसंघातील मतदार त्यांच्या पाठीशी कायम असल्याचे चित्र आहे. इम्तियाज जलील यांना उमेदवारी घोषीत झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या राजकीय वजाबाकीत विजयाचा गुणाकार एमआयएमला साधता येईल. पण महाविकास आघाडीत प्रवेशासाठी एमआयएम सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे.

भाजप हरयाणा पॅटर्न राबवणार?

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने मोठी झेप घेतली. 48 पैकी 34 मतदारसंघातून खासदारकीसाठी मविआच्या बाजूने मतदान झाले आहे. अर्थात आता पुलाखालून बरंच पाणी गेलं आहे. लाडकी बहीण योजना आणि इतर काही योजनांनी वातावरण निवळण्यास मदत झाली आहे. हरयाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निकालाचे थेट परिणाम राज्यात दिसणार नाही. भाजपला तिथे अँटी इनकम्बेंसीला मात देण्यात मोठे यश आले आहे. विविध योजनांचे इतर राज्यातील पॅटर्न राबवणारा भाजप हरयाणा पॅटर्न महाराष्ट्रात राबवणार का? त्यातून मतांची ओंजळ भरून घेण्यात या पक्षाला यश येणार का? हे लवकरच समोर येईल.

मराठवाड्यातील या मतदारसंघात धुमश्चक्री

सिल्लोड मतदारसंघात सत्तारांची सत्ता कायम राहणार?

सिल्लोड मतदारसंघात अब्दुल सत्तार यांचा करिष्मा कायम आहे. विविध पक्ष बदलून सुद्धा मतदारांनी त्यांचा आमदार बदलला नाही. पण यावेळी भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांची त्यांच्याविरोधातील नाराजी समोर आली आहे. तर महाविकास आघाडीने या मतदारसंघात मोठा प्रयोग करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या मतदारसंघात मोठी चुरस दिसू शकते.

छत्रपती संभाजीनगर पश्चिमध्ये दिसणार चुरस

या मतदारसंघात यंदा तगडी फाईट दिसेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू संजय शिरसाट यांच्यासमोर विरोधक मोठं आव्हान उभं करण्याच्या तयारीत आहेत. उद्धव ठाकरे गटाने भाजपचे राजू शिंदे यांना आपल्याकडे वळवत अगोदरच इशारा दिला आहे.

छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघात मतविभाजनाचा फायदा एमआयएमला?

एमआयएमचा मराठवाड्यात शिरकाव झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा याच मतदारसंघात मांड ठोकली. इम्तियाज जलील 2014 मध्ये निवडून आले. भाजप-शिवसेना युती तुटल्याने त्यांना मोठा फायदा झाला. आता आमदार प्रदीप जयस्वाल हे शिंदे गटासोबत तर त्यांच्याविरोधातील उमेदवार किशनचंद तनवाणी हे ठाकरे गटाकडून आहे. पण या मतदारसंघात यंदा मराठा फॅक्टरचा प्रयोग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एमआयएम मतविभाजन संधीच्या शोधात आहे.

पैठण मतदारसंघात कुणाची सरशी?

पैठण मतदारसंघात अर्थातच खासदार संदीपान भुमरे यांचा मुलगा विलास भुमरे यांना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. तर सचिन घायाळ आणि दत्तात्रय गोर्डे यांनी पण फिल्डिंग लावली आहे. यावेळी ठाकरे गटाचे बारीक लक्ष या मतदारसंघावर आहे. जे शिलेदार सोडून गेले. त्यांना धडा शिकवण्याचा चंग उद्धव सेनेने बांधला आहे.

परळीत धनंजय मुंडे यांच्यासमोर आव्हान

राष्ट्रवादीत फाटाफुटीनंतर धनंजय मुंडे हे अजितदादा गटासोबत गेले. त्याचवेळी थोरल्या साहेबांनी परळीत खेला होबेचा नारा दिला. लोकसभेत बीडमध्ये अगदी काही मतांनी भाजपची हाराकिरी झाली. भाऊ-बहीण मतभेद विसरून पुन्हा एकत्र आले. या मतदारसंघासाठी शरद पवार यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. रत्नाकर गुट्टे यांचे जावाई आता परळीच्या आखाड्यात उतरणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता विजयाची तुतारी कोण फुंकणार हे अटीतटीच्या लढतीनंतर समोर येईल.

लातूर शहराची देशमुखी कुणाकडं?

लातूर शहर विधानसभा मतदारसंघ माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा गड मानल्या जातो. 1980 पासून विलासरावांनी या मतदारसंघावर मजबूत पकड तयार केली. त्यांच्यानंतर अमितराव देशमुख यांनी जोरदार बॅटिंग केली. या मतदारसंघाची देशमुखी आपल्याकडे यावी यासाठी भाजपने अनेक डाव टाकले आहेत. यावेळी देशमुखांनी लोकसभा निवडणुकीत त्याची सव्याज परतफेड भाजपाला केली आहे. त्यामुळे भाजपा या मतदारसंघात नवीन खेळी खेळण्याच्या तयारीत आहे. तर लातूर ग्रामीण मतदारसंघात धीरज देशमुख यांच्यासाठी उमेदवारी मागण्यात आली आहे.

तुळजापूरमध्ये मधुकरराव चव्हाण मात देतील?

तुळजापूरमध्ये वयाच्या नव्वदीत मधुकरराव चव्हाण विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहे. काही दिवसांपूर्वी एका ग्रामीण भागातील सभेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा हल्ला चढवला होता. सुनील चव्हाण भाजपमध्ये गेल्याचे दु:ख त्यांनी भर सभेत सांगितले. या आघाताने ते चवताळले आहेत. राणा जगजितसिंह पाटील यांना मोठे आव्हान उभं राहू शकतं. त्यामुळे या मतदारसंघात चुरशीचा सामना रंगणार आहे.

भोकरची भाकर फिरणार?

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपवासी झाल्यापासून नांदेडमध्ये जनता काँग्रेसच्या मागे उभी ठाकली. पण वसंतराव चव्हाण यांचा विजय औटघटकेचा ठरला. खासदारकीच्या पोटनिवडणुकीत चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांचे नाव निश्चित झाले आहे. तर भाजपकडून अशोकराव चव्हाण आणि प्रतापराव चिखलीकर यांची नावं समोर आहेत. तर भोकर मतदारसंघातून अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना भाजप तिकीट देण्याची शक्यता आहे. तर आता भूमिपुत्राचा मुद्दा पण समोर येत आहे. महाविकास आघाडी आता भोकरची भाकर फिरवण्यात यशस्वी होते का याची चर्चा रंगली आहे. येथे सुद्धा अटीतटीचा समाना पाहायला मिळणार आहे.

कळमनुरीत चमत्कार घडणार का?

शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील आमदार संतोष बांगर भावनिक झाले होते. अकोला येथील आमदार नितीन देशमुख यांच्या प्रमाणेच बांगर उद्धव सेनेत असतील असा अंदाज होता. पण तो साफ खोटा ठरला. बांगर यांनी शिंदे गट जवळ केला. त्यांच्या रोखठोक बाण्यामुळे ते अनेकदा अडचणीत आले. पण त्यांची या मतदारसंघावर पकड आहे. त्यांना शह देण्यासाठी दस्तूरखुद्द उद्धव ठाकरे यांनीच कळमनुरीत लक्ष घातले आहे. आमदार बांगर यांना रोखण्यासाठी मातोश्रीवर नुकतीच खलबतं झाली. त्यामुळे कळमनुरी विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

जालना विधानसभेत आतापासूनच फटाके

जालना विधानसभाच नाही तर भोकरदन, बदनापूरमध्ये भाजपची मोठी ताकद आहे. खासदारकी खेचून आणल्याने याच मतदारसंघात महाविकास आघाडी मोठा उलटफेर करण्याच्या तयारीत आहे. परतूर आणि घनसावंगीमध्ये भाजपची खेळी सुरू आहे. महायुतीत या मतदारसंघावरून रस्सीखेच सुरू आहे. घनसावंगीमध्ये महाविकास आघाडीकडून राजेश टोपे पुन्हा झंझावात आणण्याच्या तयारीत आहे. त्यांच्याविरोधात अजितदादा गट सक्रिय झालेला आहे. त्यामुळे या मतदारसंघात टफ फाईट दिसू शकते. जालना शहराचा आपल्या काळात चेहरा-मोहरा बदलला म्हणून भाजप या विधानसभेवर हक्क सांगत आहे. रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे या मतदारसंघातून इच्छुक आहे. अर्जूनराव खोतकर यांचा या जागेवर दावा आहे. परतूरमध्ये भाजप वरचष्मा ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत. लोकसभेत रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यापासून गणितं बदलली आहेत. दानवे यांनी पराभवाचे चिंतन केले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ते सव्याज परतफेड करण्याची धास्ती अनेकांना वाटत आहे.

Non Stop LIVE Update
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?.
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य.
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा.
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका.
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी.
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”.
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा.
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर..
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर...
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी.
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?.