तुमच्यात हिंमत आणि मर्दानगी असेल तर… संजय राऊतांचे एकनाथ शिंदेंना ओपन चॅलेंज
ठाण्यातील उमेदवार पळवल्याच्या प्रकरणावर संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हिंमत असेल तर समोरून लढा, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले असून पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल उपस्थित केले आहेत.

राज्यातील महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरु आहे. त्यातच ठाण्यातील मनसे उमेदवाराबाबत समोर आलेल्या व्हिडीओवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत तीव्र शब्दांत टीका केली आहे. एकनाथ शिंदेंमध्ये हिंमत आणि मर्दानगी असेल तर त्यांनी असे पाठीमागून खंजीर खुपण्याचे उद्योग थांबवून समोरून लढावे, असे ओपन चॅलेंज संजय राऊत यांनी दिले आहे.
संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडीओचा संदर्भ दिला. यावर संजय राऊतांनी भाष्य केले. हा प्रकार लोकशाहीसाठी घातक आहे. पोलीस उमेदवारांच्या घरात जातात, त्यांना गाडीत टाकतात आणि थेट उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी घेऊन येतात. हे काम करण्यासाठी पोलिसांवर नक्कीच दबाव किंवा धमक्या असाव्यात. पोलिसांनी त्यांचे काम इमानदारीने केले असले, तरी हे चित्र संतापजनक आहे, असे संजय राऊत म्हणाले.
या प्रकरणावर निवडणूक आयोग काहीही ठोस कारवाई करणार नाही. निवडणूक आयोग केवळ अहवाल मागवेल आणि चौकशीचे आश्वासन देऊन वेळ काढेल. त्यामुळे आता या अन्यायाविरुद्ध न्यायालयात जाणे हाच योग्य मार्ग उरला आहे, असे संजय राऊतांनी म्हटले.
गलिच्छ राजकारणाबद्दल प्रचंड चीड
तुम्ही आमचा पक्ष चोरलात, चिन्ह चोरले तरी आम्ही खंबीरपणे लढतोय. पण आता तुम्हाला मशाल आणि इंजिनची इतकी भीती वाटू लागली आहे की, समोरच्या उमेदवाराने निवडणूक लढवूच नये यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. हा सर्व प्रकार तुम्ही आम्हाला घाबरला आहात हेच सिद्ध करतो, अशी टीका संजय राऊतांनी केली. १०-१५ हजार रुपये वाटून किंवा उमेदवार पळवून मुंबई-ठाण्यातील मतदारांचे मत परिवर्तन होईल, हा सत्ताधाऱ्यांचा भ्रम आहे. लोकांच्या मनात या गलिच्छ राजकारणाबद्दल प्रचंड चीड आहे आणि ही चीड मतपेटीतून नक्कीच बाहेर येईल, असेही संजय राऊत म्हणाले.
शिंदे आणि फडणवीस यांच्या मनात बाळासाहेबांची भीती
दरम्यान मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा झाकल्याच्या कारवाईवर संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला मूर्ख म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रपुरुष आहेत. जर त्यांचा पुतळा झाकला जात असेल, तर मुंबईतील अटल बिहारी वाजपेयींचे पुतळे का झाकले नाहीत? बाळासाहेबांची भीती शिंदे आणि फडणवीस यांच्या मनात आहे. पण एक पुतळा झाकून काय होणार? आज सर्वच पक्ष त्यांचे फोटो वापरत आहेत, असा टोला संजय राऊतांनी लगावला.
