‘कोरेगाव तालुक्याचे वाटोळे झाले, आता सातारा जिल्हा वाटोळ करून घेईल का?’ महेश शिंदे यांची खोचक टीका
"सातारा लोकसभा मतदारसंघात डावावर प्रति डाव चाललेला आहे. आमचे नेते खूप ताकदीचे आहेत. लवकरच उमेदवार जाहीर होतील", असा विश्वास आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला.

सातारा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर न होता महायुतीचे मेळावे घेतले जात आहेत. याबाबत आमदार महेश शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. “राजकारणामध्ये डाव प्रति डाव टाकणं खूप महत्त्वाचे आहे. पण काही लोकांना वाटतं आपण डाव टाकू आणि पुढचे गळाला लागतील असं काही होणार नाही. आमचे नेते फार ताकदीचे आहेत. म्हणूनच डावावर प्रति डाव चाललेला आहे. सर्व चित्र स्पष्ट आहे. साताऱ्यात मेळाव्याला लोकांचा प्रतिसाद मिळतोय. म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराचा खासदार निवडून येईल असा आम्हाला विश्वास आहे”, असं महेश शिंदे म्हणाले.
‘विरोधकांनी बूथ कसा टाकायचा? हा विचार करावा’
महायुतीच्या मेळाव्यामध्ये नेत्यांच्या अनुपस्थितीबाबत आमदार महेश शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “प्रत्येक नेता आपापल्या भागात काम करत असतो. माझी पण मेळाव्याला अनुपस्थिती होती म्हणजे मी काम करत नाही असं होत नाही. वाईमध्ये माजी आमदार मदन भोसले आणि आमदार मकरंद पाटील असे दोन गट आहेत. मदन भोसले गटाचा मेळावा झाला असेल. उद्या मकरंद पाटील वेगळा मेळावा घेतील. पण विरोधकांनी त्या ठिकाणी बूथ कसा टाकायचा? हा विचार करावा. त्यामुळे विरोध कुठेही नाही लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे, असं महेश शिंदे म्हणाले.
‘आता सातारा जिल्हा वाटोळ करून घेईल का?’
महाविकास आघाडीचा उमेदवारी अर्ज 15 एप्रिलला भरला जाणार आहे आणि शशिकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा निश्चित होत आहे. यावर आमदार महेश शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. “महाविकास आघाडीत एकही अर्ज भरण्यास तयार नाही. ही सत्य परिस्थिती आहे. आजच्या परिस्थितीनुसार मोदींच्या विरोधात सातारा जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नाही ही सत्य परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येक जण एकमेकांना पुढे ढकलण्याचे काम करत आहे. उमेदवार शेवटपर्यंत घेऊन जा. नाहीतर मागेच गायब होईल. कोरेगाव तालुक्याचे वाटोळ झालं. आता सातारा जिल्हा वाटोळ करून घेईल का? असा सवाल आमदार महेश शिंदे यांनी केला.
