आदित्य व अमित ठाकरेंचा पिल्लं असा असा उल्लेख, शिवसेनेच्या बड्या नेत्याची जहरी टीका
BMC Election : मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज वरळीत महायुतीची प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला शिवसेना-भाजपचे बडे नेते उपस्थित आहेत. यात ठाकरेंवर सकडून टीका करण्यात आली आहे.

राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज वरळीत महायुतीची प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला शिवसेना-भाजपचे बडे नेते उपस्थित आहेत. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. आजच्या सभेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनीही भाषण केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना 25 वर्षे मुंबईकरांसाठी काय केलं असा सवाल केला. तसेच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचा उल्लेख पिल्लं असा केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
उद्धव ठाकरेंना समोर उभं करा…
आपल्या भाषणात रामदास कदम यांनी म्हटले की, काही लोक निवडणूक आल्यावर मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार म्हणतात तेव्हा समजून घ्यायचं की निवडणुका आल्या. उद्धव ठाकरेंना समोर उभं करा, मी समोर येतो, होऊन जाऊ द्या आमनेसामने… 25 वर्षे मुंबईकरांसाठी काय केलं ते सांगा असं म्हणत कदम यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिले आहे. पुढे बोलताना रामदास कदम यांनी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा उल्लेख पिल्लं असा केला.
उद्धवजी आत्मपरीक्षण करा…
मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीवर बोलताना रामदास कदम म्हणाले की, 2 नाही तर अजून 2-5 भाऊ आले तरी मराठी माणूस तुम्हाला मत देणार नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्याय दिला. तुम्ही त्यांचे अभिनंदन का करू शकला नाहीत. उद्धवजी आत्मपरीक्षण करा. एकनाथ शिंदेंनी एक घाव घातला आणि तुम्हाला संपवलं. सौ सोनार की एक लौहार की. ही वेळ का आली याचं आत्मपरीक्षण करा.
राहुल शेवाळेंचीही टीका
शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनीही उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. शेवाळे म्हणाले की, ही गावकी भावकीची नाही तर मुंबईकरांची आहे. काल दोन युवराजांनी आपल्या उमेदवारांना प्रेझेंटेशन दिलं. उमेदवारांना निधी आणि साहित्याची अपेक्षा होती. युवराजांना माहितीच नाही त्यातील बऱ्याच गोष्टी महापालिकेच्या अखत्यारीत नाहीतच. कालचं प्रेझेंटेशन म्हणजे म्युच्युअल फंडसाठी केलेलं प्रेझेंटेशन आहे. ज्याचा हातात काही नाही त्याला मतदान करायचं नाही हे मुंबईकरांनी ठरवलं आहे असंही शेवाळे यांनी म्हटलं आहे.
