त्यांनी महाराष्ट्राचं स्मशान केलं आहे – संजय राऊत यांचा हल्लाबोल
हर्षल पाटील या तरुण उद्योजकाने 80 लाखांचे कर्ज घेऊन जलजीवन मिशन अंतर्गत काम केले पण बिल मिळाले नाही, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे महाराष्ट्रातील ठेकेदारांच्या कर्ज संकटाकडे लक्ष वेधले आहे. सरकाराची उदासीनता आणि वेळेवर बिल न मिळण्याने अनेक ठेकेदार आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. या प्रकरणी सरकार जबाबदार असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

काल हर्षल पाटील या मराठी उद्योजकाने काल आत्महत्या केली. 80 लाखांचे कर्ज घेऊन जलजीवन मिशनमध्ये 1 कोटी 40 लाखांचं काम केलं आणि त्याला बिल मिळालं नाही, शेवटी हतबलतेने त्याने आत्महत्या केली. याच मुद्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारला धारेवर धरत त्यांच्यावर टीका केली. फडणवीस आणि त्यांच्या दोन डेप्युटींनी या राज्याचं कसं स्मशान केलं आहे अशी टीका करतानाचा हर्षल पाटीलची आत्महत्या हा तर सदोष मनुष्यवध आहे असा आरोपही राऊतांनी केला.
काय म्हणाले संजय राऊत ?
मुख्यमंत्र्यांनी आज दिल्लीला येण्याऐवजी, त्या हर्षल पाटीलच्या घरी जायला हवं होतं. त्याच्या कुटुंबाचा आक्रोश या निर्दयी सरकारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पाहिला असता तर महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे हे कदाचित त्यांना कळलं असतं. या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे कोणत्या हवेत आणि कोणत्या भ्रमात, जगात वावरत आहेत ? असा सवाल राऊतांनी विचारला.
पंतप्रधानांनी परवा फडणवीसांचं खूप कौतुक केलं, त्याच पंतप्रधानांनी दोन दिवस महाराष्ट्रात येऊन रहावं आणि गेल्या 5 महिन्यात शेतकरी आणि तरूण उद्योजकांच्या ज्या आत्महत्या झाल्या त्यांच्या कुटुंबियांना बोलवावं. फडणवीस आणि त्यांच्या दोन डेप्युटींनी या राज्याचं कसं स्मशान केलं आहे ते समजून घ्यावं अशी घणाघाती टीका राऊतांनी केली.
हर्षल पाटीलच्या मृत्यूनंतर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का ?
हर्षल पाटीलची आत्महत्या हा तर सदोष मनुष्यवध आहे असा आरोपही राऊतांनी केला. त्याला आत्महत्या का करावी लागली, जलजीवन मिशनच्या कामाचे पैसे त्याला वेळेवर का मिळू शकले नाहीत, त्याला कोण जबाबदार, कोणते मंत्री, कोणते अधिकारी जबाबदार आहेत ? अशा प्रश्नांच्या फैरी झाडत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणारा का असा सवालही राऊतांनी उपस्थित केला. त्याला द्यायला सरकारकडे 1 कोटी 40 लाख नाहीत का ? ठेकेदारांची 80 हजार कोटींची बिलं थकली आहेत, अनेक ठेकदारांनी आत्महत्या केल्या, काहींनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आणि काल हर्षल पाटील या तरूणाने आत्महत्या केली. तरीसुद्धा सरकारमधले हे 2-3 लोकं नरेंद्र मोदींप्रमाणे मौज-मजा करत फिरत आहेत अशी बोचरी टीका राऊतांनी केली.
तुमच्या पक्षात आणि सरकारमध्येच नक्षलवाद
मुख्यमंत्र्यांचा परवा वाढदिवसाच्या दिवशी गडचिरोलीमध्ये गेले आणि तिथून म्हणाले की शहरामध्ये नक्षलवाद वाढला आहे. अहो तुमच्या पक्षामध्ये आणि सरकारमध्ये नक्षलवाद आहे. नक्षलवाद म्हणजे हिंसाचार असेल तर तुमचे लोक हिंसाचार करत आहेत. काल दौंडमध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या भावाने एका नर्तिकेवर गोळ्या झाडल्या, ही हिंमत येते कुठून असा सवाल राऊतांनी विचारला. हा नक्षलवादच आहे ना. खुलेआम मारामाऱ्या होत आहेत, सरकारचे लोक एकमेकांवर हल्ले करत आहेत, हा नक्षलवादच आहे ना. आधी तुमच्या सरकारमधील नक्षलवाद, हनी ट्रॅप हा सुद्धा नक्षलवादच आहे, हाही एक प्रकारचा नाजूक दहशतवाद आहे.
हे सगळं तुमच्या सरकारमध्ये सुरू असताना, फडणवीस तुम्ही गोलगप्प्यासारखे गोड गप्पा कोणाला मारून दाखवताय असा टोला राऊतांनी लगावला. हे प्रकार थांबवा आता. महाराष्ट्र खतम होतोय, तो लुटला जातो, महाराष्ट्राची बेअब्रू होत आहे अशी टीका राऊतांनी केली.
