Ajit Pawar : 65 मिमी पावसाची ती अट, शेतकऱ्यांच्या जीवाला घोर, मग अजितदादांनी काय दिले आदेश?
Ajit Pawar on 65mm rain criteria : अतिवृष्टीने विदर्भ,मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. ओला दुष्काळावर सरकार थेट बोलायला कचरत आहे. त्यातच मदत देताना निकष आणि अटी अडचणीच्या ठरत आहेत. 65 मिमी पावसाच्या एका अटीसंबंधी शेतकऱ्याने चिंता व्यक्त केल्यावर अजितदादांनी असे आदेश दिले.

विदर्भ,मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रावर पाऊस कोपला आहे. या भागात मुसळधार पावसाने (heavy rain) शेती आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. नदी,ओढ्या काठच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. काही ठिकाणी विहीर बुजल्या आहेत. काल राज्य सरकारने तातडीची मदत जाहीर केली. पंचनाम्याप्रमाणे नुकसानीसाठी मदतीला मंजूरी दिली. ओला दुष्काळावर सरकार थेट बोलायला कचरत आहे. त्यातच मदत देताना निकष (criteria) आणि अटी अडचणीच्या ठरत आहेत. 65 मिमी पावसाच्या एका अटीसंबंधी शेतकऱ्याने चिंता व्यक्त केल्यावर अजितदादांनी असे आदेश दिले.
सीना नदी सोलापूरवर कोपली आहे. सीनाला पहिल्यांदाच इतका मोठा पूर लोटला. अनेक शेतं आणि घरं पाण्याखाली गेली. अतिवृष्टीमुळं सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावात मोठे नुकसान झाले. बुधवारी सकाळपासून उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी कोर्टी या गावाला भेट दिली. त्यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. त्यावर दादांनी थेट बोलणं टाळलं.
65 मिमीची अट ठेवणार नाही
माढा तालुक्यात पुरस्थितीचा आढावा घेताना शेतकऱ्यांनी मराठवाड्यात जास्त मदत मिळत असल्याचा सूर आळवला. तर 65 मिमीची अट असल्यामुळे कमी मदत मिळण्याची भीती व्यक्त केली. त्यावर अजितदादांनी मदत करताना दिवसभरात 65 मिमी पाऊस पडल्याची अट ठेवणार नसल्याची ग्वाही दिली. अडचणीच्या काळात नियमांवर फार बोट ठेवू नका अशा सूचना त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना दिल्या. तर ड्रोनद्वारे पंचनामे करू असे आश्वासन त्यांनी दिले. निधीची चिंता करू नका असेही अजितदादा म्हणाले. अडचणीच्या काळात सरकार तुमच्या पाठीशी असल्याचे ते म्हणाले.
तू ते डोक्यातून काढून टाक
कांदा गेलेलाच आहे. 65 मिमीची अट आहे, अशी तक्रार एका तरुण शेतकऱ्यानं अजितदादांकडे केली. त्यावेळी तू ते डोक्यातून काढून टाक. आज आम्ही सर्व जण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पाहणी करत आहेत. आता डोळ्यांनीच बघितलं असल्याने ती काळजी करण्याची गरज नाही. काही भागात वरच्या भागातून एकदम पाणी आलं. त्यानं नुकसान झालं. तर काही भागात एका दिवसात 65 मिमी पाऊस नाही पडला. पण रोज चांगला झाला. त्यामुळे 65 मिमीची अट काही राहणार नाही. शेतकऱ्यांच्या भल्याचं जे करता येईल ते सर्व करू, असं आश्वासन अजितदादांनी शेतकऱ्यांना दिले.
