Maharashtra Breaking News LIVE 03 October 2024 : उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना जामीन
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 03 ऑक्टोबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

शारदीय नवरात्रीला आजपासून सुरुवात झाली आहे. यानिमित्त महाराष्ट्रातील सर्व देवींच्या मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. आज घटस्थापनेचा मुहुर्त साधत अनेक राजकीय मोठ्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदा महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. महाविकासआघाडी आणि महायुतीत जागावाटपाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तर काही पक्षांकडून उमेदवारांच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. आज ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. यावेळी ते मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
नवी मुंबईत नवरात्र उत्सवावरुन ठाकरे गट आणि शिंदे गटात वाद
अनेक वर्षांपासून नवी मुंबईतील नेरूळमध्ये शिवसेनेच्या वतीने नवरात्र उत्सव साजरा होत आहे. मात्र शहर प्रमुख विजय माने यांनी ठाकरे गटाची साथ सोडली आणि शिवसेना शिंदे गटात सामील झाले. ज्या जागेवर नवरात्र उत्सव साजरा होत असतो त्या ठिकाणी विजय माने यांनी दावा केला आहे. मात्र त्याला ठाकरे गटाने विरोध केला आहे. विजय माने यांनी बांधलेला मंडप हटवल्याने विजय माने यांनी पोलिसांसमोर धिंगाणा घातला. आपण रॉकेल ओतून आत्महत्या करत असून केलेल्या कारवाईबाबत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तक्रार करणार असल्याचे सांगितले. यावेळी रस्त्यावर विजय माने मोठमोठ्याने ओरडत असल्याचे दिसून आले.
-
श्रीकांत शिंदे यांनी साधला धुळे जिल्ह्यातील लाभार्थी इंदुबाई पाटील यांच्यांशी संवाद
शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील धुळे जिल्ह्यातील लाभार्थी इंदुबाई पाटील यांच्यांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. या योजनेतून मिळालेल्या पैशांमधून इंदुबाई यांनी नवीन भांडी घेतली. त्यावर मुख्यमंत्र्यांचे नाव टाकून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रती आभार व्यक्त केले.
-
-
हरियाणा: अशोक तंवर यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला
भाजप नेते अशोक तंवर यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राहुल गांधींच्या व्यासपीठावर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तन्वर यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.
-
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वाद प्रकरणी केंद्र उद्या सर्वोच्च न्यायालयात उत्तर देणार
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वाद प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान, एसजी तुषार मेहता म्हणाले की, ते उद्या सकाळी केंद्राचे उत्तर सादर करतील. उद्या सकाळी 10.30 वाजेपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
-
ईडीने मोहम्मद अझरुद्दीनला समन्स बजावले
मनी लाँड्रिंग प्रकरणात टीम इंडियाचा माजी क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनच्या अडचणी वाढू शकतात. एचसीएमधील अनियमिततेच्या आरोपावरून अंमलबजावणी संचालनालयाने त्यांना समन्स बजावले होते पण आज ते ईडीसमोर हजर राहू शकले नाहीत. आता तपास यंत्रणेने त्याला 8 ऑक्टोबरला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या 20 कोटी रुपयांच्या निधीची अफरातफर करण्यात आली आहे.
-
-
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात आयआरजीसीचा टॉप कमांडर मजीद दिवानी मारला गेला
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात IRGC टॉप कमांडर माजीद दिवानी यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. इस्त्रायली सैन्याने सीरियात केलेल्या हवाई हल्ल्यात दिवानी गंभीर जखमी झाले होते. मजीद दिवानी हे आयआरजीसीचे लष्करी सल्लागार म्हणून सीरियामध्ये तैनात होते.
-
राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे अमरावती दौऱ्यावर
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आज अमरावतीत आगमन झालं आहे. अमरावतीच्या शासकीय विश्रामगृहात शहर पोलिसांच्या बँड पथकाने राधाकृष्णन यांना मानवंदना दिली. यावेळी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
-
हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांचे तुतारीचे स्टेटस
हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी तुतारीचे स्टेटस ठेवण्यास सुरुवात केली आहे. चिरंजीव राजवर्धन पाटील यांनी तुतारीचे स्टेटस ठेवले आहे. हर्षवर्धन पाटील उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात अधिकृत प्रवेश करण्याची घोषणा करण्याची इंदापुरात चर्चा रंगली आहे.
-
शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
सोलापुरात शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला. बेकायदेशीर जागा बळकावून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी सुजित खुर्दसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सुजित खुर्द हा शिवसेना शिंदे गटाच्या युवासेनेचा प्रदेश कार्यकारणी सदस्य आहे.
-
राजकारणी आता 24 तास सक्रिय
राजकारणी माणसाला सुद्धा आता 24 तास सक्रिय राहावं लागतं, असे गुलाबराव पाटील म्हणाले. आमची फॅकल्टी जनरल फिजिशियन सारखे आहे.. एखादा डॉक्टर ऑर्थोपेडिक असला तर तो हाडांची तपासणी करतो हृदयरोग तज्ञ असला तर तो हृदयाची तपासणी करतो. मात्र आमच्याकडे जनरल फिजिशियन सारखं काम आहे… एखाद्याची पत्नी नांदत नाही ही सुद्धा तक्रार आम्हाला ऐकून घ्यावे लागते, असे ते म्हणाले.
-
बदलापूर अत्याचार प्रकरणात शाळेचे अध्यक्ष आणि सचिव दोघांना जामीन मंजूर
दीड महिन्यांपासून फरार असलेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना काल रात्री अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना आज कल्याण कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टाने त्यांना एका प्रकरणात जामीन मंजूर केला. तरीही त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे.
-
कोळी समाजाचे शिष्टमंडळ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भेटीला
कोळी समाजाचे शिष्टमंडळ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भेटीला आले आहे. गेल्या नऊ दिवसापासून कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू आहे. कोळी समाजाच्या वतीने पालकमंत्र्यांची गाडी अडवण्याचा किंवा फोडण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी कोळी समाजाच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी बोलावले आहे.
-
न्यायालयाच्या निर्देशामुळे प्रकल्पग्रस्त आणि खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण
बेलापूरच्या मैदानावर हॉस्पिटल बांधण्यास मनाई करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावलंय. कोणतेही बांधकाम करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच हॉस्पिटल अन्यत्र बांधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निविदा प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश न्यायलयाने दिले आहेत. न्यायालयाच्या निर्देशामुळे प्रकल्पग्रस्त आणि खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण सोहळा
रोहा नगरीत आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. राज्यातील सर्वात उंच पुतळा असणार आहे. हा पुतळा 25 फुटांचा आहे. माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाला छत्रपती संभाजी राजे, छत्रपती उदयनराजे भोसले, सुनील तटकरे, भरत शेठ गोगावले उपस्थित राहणार आहेत.
-
तुम्ही कितीही वर्ग तयार करा, पण विधानसभेत हेडमास्तर मराठा समाज : जरांगे पाटील
मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय आचारसंहिता लावू नये. लोकसभेवेळेस सांगितले होते आणि आताही सांगतोय, मराठ्याच्या मागण्या पूर्ण करा, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. तुम्ही कितीही वर्ग तयार करा, पण विधानसभेत हेडमास्तर मराठा समाज असेल असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय. ते अंतरवली सराटीत बोलत होते.
नारायण गडावरील दसरा मेळाव्याला राज्यभरातून मराठा समाजाने यावे, जे दुसरे मेळावे घेत आहेत त्यांच्या एसटी बसेस रिकाम्या जाऊ द्या. मराठा समाजाची इच्छा होती, की एक तरी मराठा समाजाचा दसरा मेळावा व्हावा. आम्हाला राजकारण करायचे नाही, आमच्या मराठा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करा”, असं जरांगेंनी नमूद केलं.
-
हर्षवर्धन पाटलांकडून शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात अधिकृत प्रवेशाची घोषणेची शक्यता
इंदापूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी तुतारीचे स्टेटस ठेवण्यास केली सुरुवात आहे. हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांनीही तुतारीचं स्टेटस ठेवलंय. इतकंच नाही तर इंदापूरमधील अनेक कार्यकर्त्यांनी स्टेटस ठेवलं आहे. हर्षवर्धन पाटील शुक्रवारी 4 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात अधिकृत प्रवेश करण्याची घोषणा करण्याची चर्चा आहे.
-
गुणरत्न सदावर्ते बिग बॉसमध्ये झळकणार
हिंदी बिग बॉस सिझन- १८ मध्ये मुंबईतून एडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांचा सहभाग असणार,गुणरत्न सदावर्ते सर्वात जादा मानधन असलेले कंटेस्टंट आहेत.
-
बदलापूर प्रकरणाती दोघा आरोपींना कोर्टा हजर करणार
बदलापूर अत्याचार प्रकरणी एसआयटीची टीम उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. थोड्याच वेळात बदलापूरमधील दोन्ही आरोपींना कल्याण न्यायालयात करणार हजर केले जाणार आहे.
-
जरांगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
छत्रपती संभाजीनगर मधील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये नऊ दिवस उपचार घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा आंतरवाली सराटी पोहोचले आहेत. अंतरवाली पोहचल्यानंतर जरांगे यांनी ग्रामदेवतेचे दर्शन घेतले.
-
शिवसेना, राष्ट्रवादी याचिकेवर १५ ऑक्टोबरला सुनावणी
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आजही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी नाही. आज सुनावणी होती पण मॅटर बोर्डवर आला नाही. आता या प्रकरणावर १५ ऑक्टोबरला सुनावणी
-
जीवे ठार मारण्याचा चिठ्ठ्या
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील सर्वात मोठ्या शॉपिंग मॉल मध्ये अजब प्रकार समोर आला आहे, मॉल मधील वीस ते पंचवीस दुकानां समोर इंग्लिश भाषेमध्ये जिवे ठार मारण्याचा मजकूर लिहिलेल्या चिठ्या आढळल्या आहेत,
-
विदेशी महिलेचा रुग्णालयातून डिस्चार्ज
सिंधुदुर्गच्या जंगलात बांधलेल्या अवस्थेत सापडलेल्या विदेशी महिलेला आज रत्नागिरीच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या 2 महिन्यांपासून ती प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेत होती.
-
शिवसेना उबाठाचे गाणे नंदेश उमप यांनी गायले
शिवसेना उबाठाने तयार केलेले गाणे नंदेश उमप यांनी गायलं आहे. त्यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतरचं त्यांचं पहिलं गाणं आहे. त्यांचा पहाडी आवाज तसाच आहे. श्रीरंग गोडबोले आणि नंदेश उमप यांचाही या गाण्यात सहभाग आहे.
-
शिवसेना ठाकरे पक्ष एक्शन मोडमध्ये
पितृपक्ष संपताच शिवसेना ठाकरे पक्ष ॲक्शन मोडमध्ये आला आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवसापासून उद्धव ठाकरे ॲक्शनमोडमध्ये आले आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार घटस्थापनेपासून सुरुवात होणार आहे.
-
पुण्यात आरोपींवर पॉक्सोअंतर्गत कारवाई होणार – देवेंद्र फडणवीस
पुण्यात स्कूल बसमध्ये मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श. पुण्यातील आरोपींवर पॉक्सोअंतर्गत कारवाई होईल. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहीती. पुण्यात स्कूल बसमध्ये ड्रायव्हरकडून दोन चिमुकलींवर अत्याचार.
-
गोविंदाला गोळी लागली, त्यावर अजित पवार म्हणाले….
“गोविंदा पिस्तुल पहायला गेला आणि गुडघ्यात गोळी गेली ती कशी गेली?. गोविंदा हे खासदार होते, त्यामुळे खरं मानावं लागेल. कारण मी देखील खासदार होतो” अजित पवार यांची मिश्किल टिप्पणी. “कामाच्या व्यापात मुलांवर दुर्लक्ष केल्यास त्याची किंमत मोजावी लागते. कुणी म्हणाल दादा एवढ्या वेळेस पदरात घ्या ,पांघरूण टाका. यावर अजित पवार म्हणाले, ‘माझा पदर फाटून गेलाय आणि पदर देखील उडून गेलाय’
-
पुणे स्कूल बस अत्याचार प्रकरण
पुण्यात स्कूल बसमध्ये ड्रायव्हरकडून दोन चिमुकलींवर अत्याचार. “दोन अल्पवयीन मुलींच्या आईंची तक्रार आहे. आरोपीला अटक केली आहे. स्कूल बसमध्ये महिला मदतनीस होती का? याचा तपास करत आहोत. स्कूल बस शाळेची होती की भाडेतत्त्वावर घेतलेली? याबाबत माहिती घेत आहोत” आर राजा यांनी ही माहिती दिली. अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण पाटील आणि पोलीस उपायुक्त आर राजा यांच्यात बैठक
-
करमाळयात श्री कमलाभवानी मातेच्या नवरात्र महोत्सवाला सुरुवात
करमाळयाची कमलाभवानी माता हे तुळजापूरच्या देवीचे प्रतिकात्मक रूप म्हणून ओळख. सन 1727 मध्ये मधील पुरातन मंदिर राजेराव रंभानिंबाळकर यांनी बांधले होते मंदिर. मंदिर परिसरात उभारला 12 ज्योतिर्लिंग मंदिराचा देखावा व अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज यांचा देखावा. दर्शनासाठी भाविकांची गर्दी.
-
बदलापूर अत्याचार प्रकरणी उदय कोतवाल यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
बदलापूर अत्याचार प्रकरणी उदय कोतवाल यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. थोड्याच वेळात उदय कोतवाल आणि तुषार आपटे यांना कल्याण सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. काल उदय कोतवाल यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं होतं.
-
पायाला गोळी लागल्यानंतर गोविंदाच्या प्रकृतीविषयी महत्त्वपूर्ण अपडेट
गोविंदाच्या पायातून गोळी काढण्यात आली आणि पायाला 8 ते 10 टाके लागल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. आता गोविंदाच्या प्रकृतीविषयी दिलासादायक माहिती समोर येत आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्याला आयसीमधून नॉर्मल वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आहे. गोविंदाला आज किंवा उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो.
-
धुळ्यातील एकवीरा देवी मंदिरात नवरात्रौत्सवाचा उत्साह
धुळे- महाराष्ट्रातलं पाचवं शक्तिपीठ एकवीरा देवी मंदिरात आजपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली. दुपारी बारा वाजता मंदिरात घटस्थापना होणार आहे. शहरातलं एकवीरा देवी मंदिर पाचशे वर्षे जुनं मंदिर आहे. नवरात्र उत्सव काळात देवीचे पाठ, कन्या पूजन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. या देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह छत्तीसगड, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश इथले भाविकही दर्शनाला येतात.
-
“निवडणूक लागण्याआधी मराठ्यांच्या मागण्याचा विचार करा”; जरांगेंचा इशारा
“निवडणूक लागण्याआधी मराठ्यांच्या मागण्याचा विचार करा, नाहीतर फडवणीस यांच्या आयुष्यातील मोठी पश्चात्तापाची वेळ येईल. भाजपमधील मराठ्यांनी पण हाच विचार करा आणि फडणवीस यांना सांगा”, असं जरांगे म्हणाले.
-
दसरा मेळावा आणि विधानसभा एकत्र आल्या त्याला आम्ही काही करू शकत नाही- जरांगे पाटील
“अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दसरा मेळाव्याला या. दसरा मेळावा आणि विधानसभा एकत्र आल्या त्याला आम्ही काही करू शकत नाही. नारायणगडावर होणारा दसरा मेळावा हा मराठा दसरा मेळावा नाही, या मेळाव्याला अठरा पगड जातीचे लोक येणार आहेत,” असं जरांगे पाटील म्हणाले.
-
दसरा मेळावा आहे पण त्याचे राजकीय अर्थ काढू नका- मनोज जरांगे पाटील
“अजूनही तब्येत बरी नाही, परंतु दसरा मेळावा आहे आणि त्याचं नियोजन करण्यासाठी हॉस्पिटलमधून सुट्टी घेत आहे. राज्यातील मराठयांची इच्छा होती की दसरा मेळावा झाला पाहिजे. दसरा मेळावा आहे पण त्याचे राजकीय अर्थ काढू नका,” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
-
ग्रँट रोड भागातील इमारतीचा स्लॅब कोसळला, ढिगाऱ्याखाली एक व्यक्ती अडकली
मुंबईतील ग्रँट रोड भागातील एका इमारतीचा स्लॅब कोसळला आहे त्या ढिगाऱ्याखाली एक जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक दुर्घटनास्थळी दाखल झालं आहे.
-
रत्नागिरी- राजापूर लांजा विधानसभा मतदार संघाच्या जागेवरून आघाडीत धुसफुस
रत्नागिरी- राजापूर लांजा विधानसभा मतदार संघाच्या जागेवरून आघाडीत धुसफूस सुरू आहे. काॅग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी थेट उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवीवर निशाणा साधला आहे. लांजा इथं सभा घेत अविनाश लाड यांनी राजापूर लांजा विधानसभेवर दावा सांगितला .
-
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अखेर शासकीय निवासस्थान सोडणार
नवी दिल्ली – दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अखेर उद्या शासकीय निवासस्थान सोडणार असल्याची माहिती समोर येत आहे.
केजरीवाल यांचा आता नवा पत्ता फिरोजशहा रोडवर असेल. आप पक्षाचे राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांच्या घरी अरविंद केजरीवाल राहणार . तर मित्तल यांचे घर नवी दिल्ली विधानसभा क्षेत्रामध्ये असेल.
-
आम्हाला गद्दार गटाचा पराभव करायचा आहे – संजय राऊत
आम्ही आकड्यांवर लढ नाही तर महाविका आघाडी म्हणून एकत्र लढत आहोत. जो जिंकेल त्याला जागा दिली जाईल. आम्हाला गद्दार गटाचा पराभव करायचा आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.
-
पुणे – स्कूल बसमध्ये ड्रायव्हरकडून 2 चिमुकल्या मुलींवर अत्याचार
पुण्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. स्कूल बसच्या ड्रायव्हरने 2 चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे. वानवडी परिसरसातील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
देवेंद्र भुयार याचं वक्तव्य मुलींना वेदना देणारं – अजित पवार
देवेंद्र भुयार यांचं वक्तव्य चुकीचं, त्याचं वक्तव्य मुलींना वेदना देणारं आहे. त्यांना समज दिली आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
-
ज्योत घेऊन येणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला
तुळजापूरहुन ज्योत घेऊन येत असताना भाविकांवर काळाने घाला घातला आहे. या भीषण अपघातात दोघे जागीच ठार तर सहा जण गंभीर जखमी झालेत. तुळजापूरहून मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडीकडे जाताना कामतीमध्ये अपघात झाला आहे. कामतीमध्ये रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खड्ड्यात पिकअप गाडी पलटी झाली आहे. या अपघातात प्रदीप क्षीरसागर आणि नेताजी कराळे हे दोघे जागीच ठार झाले. तर बाकीचे सहा जण गंभीर जखमी असून जखमींना उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे. या घटनेमुळे गोणेवाडी गावात शोक व्यक्त केला जातोय.
-
शरद कोळी यांचा इशारा
सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना कोळी समाजाचा इशारा दिला आहे. पालकमंत्र्यांनी चार भिंतीत बैठक न घेता उपोषणस्थळी बैठक घ्यावी. अन्यथा कोळी बांधवांकडून पालकमंत्र्यांच्या गाड्याची तोडफोड झाली तर आंदोलनकर्ते जबाबदार राहणार नाहीत. शिवसेना उपनेते आणि कोळी समाजाचे नेते शरद कोळींचा प्रशासनाला इशारा दिला आहे. कोळी जमातीची बैठक चार भिंतीच्या आत नाही तर पालकमंत्री यांनी उपोषणस्थळी येऊन घ्यावी. अन्यथा पालकमंत्री यांना कोळी बांधवांकडून काळे झेंडे दाखवले, गाड्या तोडफोड केली, अडवलं तर आंदोलनकर्ते जबाबदार राहणार नाहीत, असा इशारा धाडस संघटनेचे अध्यक्ष शरद कोळी यांनी दिला आहे.
-
सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी गर्दी
नाशिकच्या गडावरील सप्तश्रृंगी देवी मंदिरात दर्शनासाठी पडदा हटवला आहे. देवीला अलंकार चढवल्यानंतर भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार आहे. पडदा उघडताच भाविकांकडून जयघोष करण्यात आला. देवीचा साज शृंगार झाल्यानंतर मंदिरात आरती सुरु होणार आहे.
-
बारामतीत शक्ती अभियान राबवण्यात येणार
मधल्या काळात बारामतीत अतिशय दुर्दैवी घटना घडली. झालेल्या घटनेबद्दल कायदा सुव्यवस्था अशी का निर्माण झाली? आज सकाळी पोलीस आयुक्त आणि पोलीस अधिकारी यांच्याशी चर्चा केलीय. कॉलेज भागात जी घटना घडली त्याबद्दल चौकशी करण्यात येत आहे. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी काळजी घेण्यात येणार आहे. बारामतीत शक्ती अभियान नवीन सुरू करण्यात येणार आहे, असं अजित पवार म्हणाले.
-
शिंदेंचा ‘कॉमन मॅन’ म्हणून उल्लेख,गुडलक चौकात बॅनर
पुण्यातील गुडलक चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कॉमन मॅन म्हणून बॅनर लागला आहे. दिवस रात्र काम करणारा मुख्यमंत्री असा आशय बॅनरवर लागला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून प्रचाराची सुरुवात केली गेली आहे. मुख्यमंत्र्यांचा मोठा बॅनर झळकला आहे.
-
Maharashtra News Live : पुण्यात काँग्रेसने भरले इच्छुकांचे अर्ज, ४ ऑक्टोबरला महत्त्वाची बैठक
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने इच्छुकांचे अर्ज भरुन घेतले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २१ जणांनी अर्ज भरले आहेत. येत्या ४ तारखेला पुण्यात इच्छुक उमेदवारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत माहिती दिली जाणार आहे. जुन्नरमध्ये सत्यशील शेरकर यांनी उमेदवारी उमेदवारी मागितली आहे. सत्यशील शेरकर काँग्रेसकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. तर पुरंदरमध्ये विद्यमान आमदार संजय जगताप आणि भोर ला संग्राम थोपटे यांनी भरला अर्ज
-
Maharashtra News Live : पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावरील सुविधांची तपासणी
पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून नियोजनला सुरुवात झाली आहे. यामुळे पुण्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर शौचालय, वीज आणि रॅम्पची सुविधा असणार आहे. यावेळी पुणे जिल्हाधिकारी जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत. पुण्यात २१ विधानसभा मतदारसंघ असून ८ हजार ४१४ मतदान केंद्र आहेत.
-
Maharashtra News Live : माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
भूम,परंडा वाशीचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे आजाराने दुःखद निधन झाले आहे. पुण्यातील रुबी हॉल या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु होते. रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आज परंडा तालुक्यातील त्यांच्या भोत्रा या गावी दुपारी 1 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. ते उद्धव ठाकरे गटाचे कट्टर समर्थक होते.
-
Maharashtra News Live : कल्याण पूर्वमध्ये सुलभा गायकवाड सक्रीय, भाजपचे तिकीट मिळणार?
कल्याण पूर्व येथील भाजपचा उमेदवार ठरल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आमदार गणपत गायकवाड यांच्या अनुपस्थितीत पत्नी सुलभा गायकवाड सक्रीय झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुलभा गायकवाड यांनी मतदारसंघात नेतृत्वाची जबाबदारी घेतली आहे. कल्याण पूर्व भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. यामुळे मतदार संघातील महिलांची विधानसभेत पुढे जायची इच्छा आहे. ती इच्छा पूर्ण करणार, असा दावा सुलभा गायकवाड यांनी केला आहे.
Published On - Oct 03,2024 8:29 AM
