‘मी नाही नाराज, मी राहिलो नाराज तर…,’ काय म्हणाले रामदास आठवले? ज्यामुळे उपस्थितात पिकली खसखस..
एखाद्या राज्यापेक्षाही मोठे बजेट असणाऱ्या मुंबई महानगर पालिकेवर कोणाची सत्ता येणार याचा फैसला येत्या १५ जानेवारी रोजी होणार आहे. या निवडणूकांची रणधुमाळी सुरु असतानाच महायुतीची संयुक्त सभा वरळीच्या डोम येथे झाली.

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या निवडणूकीत ठाकरे ब्रँडचा कस लागणार आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधू राजकारणातील आपली शेवटची संधी म्हणून एकत्र आले आहेत. येत्या 15 तारखेला मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकांचे मतदान आहे. दिवस खूपच कमी असताना महायुतीने सरशी करत आज वरळी या आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघातून प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तडाखेबंद भाषणे झाली.तत्पूर्वी आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी नेहमीप्रमाणचे आपल्या कवितांतून उपस्थितात हशा पिकवला.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना चांगलीच खसखस पिकवली. त्यांनी यावेळी आपली एक कविता सादर केली.
ती कविता पुढील प्रमाणे…
मी आलेलो आहे वरळीच्या डोममध्ये,
पण मी नाही डोम कावळा…
पण मी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा,
माझा रंग आहे सावळा, पण मी राजकारणात उद्धव ठाकरेंसारखा बावळा
मी नाही नाराज, मी राहिलो नाराज तर मुंबईत कसे येईल राज
मी आलेलो आहे आज..
कारण मुंबईच्या महापौर पदावर चढवायचा आहे साज !
अशी कविता सादर करताच सभागृहात एकच हशा पिकला आणि श्रोत्यांनी टाळ्या वाजवून त्यास दाद दिली…. त्यानंतर रामदास आठवले पुढे म्हणाले की..
एकत्र आले आहेत फडणवीस आणि शिंदे
त्यांनी बंद केले राज आणि उद्धव यांचे धंदे..!
‘आमची मजबूत महायुती ठाकरेंची होणार माती’
रामदास आठवले म्हणाले की, ‘आमची मजबूत महायुती ठाकरेंची होणार माती ‘ यावेळी ते म्हणाल की आम्हाला जागा का सोडल्या नाही माहित नाही, पण महायुती सोबत मी आहे. उद्धव आणि राज एकत्र आले तरी काही परिणाम होणार नाही असेही त्यांनी सांगितले. यावेळी या सभागृहात “देवाभाऊ मराठी माणसांची मुंबई जिंकाच, तुम्हाला शुभेच्छा” असा फलक डबेवाले संघटनेकडून झळकवण्यात आला.
देशातील ३ लाख कोटींचा सर्वात मोठा भ्रष्टाचार मुंबई महापालिकेत झाला. यांनी 25 वर्षात एकही काम केलं नाही. उद्धव ठाकरेंना माझे आव्हान आहे की तुम्ही मुंबईत केलेलं एक काम दाखवा असे आवाहन यावेळी मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांनी केले. कोविडमध्ये लोक मरत असताना तुम्ही भ्रष्टाचार करत होता असा आरोपी साटम यांनी केला.
ममदानी उमर खालिदला पत्र लिहितो…
न्यूयॉर्कचा महापौर जोहरान ममदानी हा उमर खालिदला पत्र लिहितो. फडणवीस यांच्या काळात आम्ही एकही कार्यक्रम आम्ही होऊ दिला नाही. जोहारान ममदानीने उमर खालिदला लिहिलेलं पत्र हे एक आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे. अशाच प्रकारचे कट कारस्थान मुंबईत रचले जात असून उद्धव ठाकरे त्याचे भागीदार आहेत असा आरोपही अमित साटम यांनी यावेळी केला.
मग २० वर्षांपूर्वी कोणासाठी वेगळे झाला होता ?
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केले. राज आणि उद्धव ठाकरे या बंधूंच्या एकत्र येण्यावर टीका करताना शिंदे म्हणाले की हे बंधू दवंडी पिठवत आहेत की आम्ही मराठी माणसांच्या हितासाठी एकत्र आलो आहोत, मग २० वर्षांपूर्वी कशासाठी वेगळे झाला होतात ते पण एकदा सांगून टाका असा बोचरा सवाल यावेळी एकनाथ शिंदे यांनी केला. ते पुढे म्हणाले त्यामुळे तुमचा स्वार्थ होता अहंकार होता. परंतू आता जनतेने तुमचा बँड वाजवल्यावर तुम्हाला ब्रँडची आठवण आली आहे. खरा ब्रँड कोण होते ते केवळ बाळासाहेब होते असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
