नाराज सचिन पायलट यांना दोन पदं, अशोक गहलोत मुख्यमंत्री!

नाराज सचिन पायलट यांना दोन पदं, अशोक गहलोत मुख्यमंत्री!

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला आहे. ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आहे. तर नाराज असलेले युवा नेते सचिन पायलट यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद सोपवण्यात आलं आहे. चर्चा, बैठकांच्या असंख्य मालिकांनंतर पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी अखेर तोडगा काढला. सचिन पायलट यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद असेलच शिवाय सध्याचं प्रदेशाध्यक्षपदही कायम राहिल.  वाचा: पीएमची जात दाखवत सीएमची दावेदारी, सचिन पायलट यांच्या 7 अटी

सचिन पायलट की अशोक गहलोत हा तिढा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होता. यातील अशोक गहलोत हे नाव निश्चितही करण्यात आलं होतं. मात्र सचिन पायलट समर्थकांनी राडेबाजी सुरु केल्याने या नावाची घोषणा थांबवली होती. त्यादरम्यान राहुल गांधींनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडवला. मध्य प्रदेशातही ज्येष्ठ नेते कमलनाथ यांना मुख्यमंत्रपीद सोपवलं, त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांना माघार घ्यावी लागली.

सूत्रांच्या मते सचिन पायलट यांनी राहुल गांधींसमोर 7 महत्त्वाचे मुद्दे ठेवले होते. त्यानंतर राजस्थानकडे रवाना होत असलेल्या अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांना दिल्लीतच थांबवण्यात आलं होतं. अखेर राहुल गांधी यांनी दोघांच्या खांद्यावर हात टाकून फोटो ट्विटरवर शेअर केला आणि मुख्यमंत्रीपदाची घोषणा केली. वाचा: लंडनमध्ये मुस्लीम मुलीवर प्रेम, सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी

राजस्थानचा निकाल

राजस्थान विधानसभा निवडणुकीत 199 पैकी 99 जागा काँग्रेसने तर 73 जागा भाजपने जिंकल्या. अन्य पक्ष आणि अपक्षांना मिळून 27 जागा मिळाल्या. शिवाय सपा-बसपाने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसने बहुमताचा आकडा आता पूर्ण केला आहे.

राजस्थान विधानसभा निवडणूक निकाल (199) :

  • काँग्रेस –  99
  • भाजप – 73
  • इतर – 27

कोण आहेत अशोक गहलोत?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांनी आतापर्यंत दोन वेळा राजस्थानचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. काँग्रेसच्या केंद्रीय संघटनेत अत्यंत महत्त्वाचं पद त्यांच्याकडे आहे. शिवाय कार्यकर्ते आणि जनतेमध्ये गहलोत यांची छाप आहे. अत्यंत कमी वयात प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या गहलोत यांच्याकडे कुशल संघटक म्हणून पाहिलं जातं.

अशोक गहलोत यांची दुसरी बाजूही आहे. कारण, राजस्थानच्या जनतेने नवा बदल म्हणून काँग्रेसला निवडून दिलंय. पण अशोक गहलोत हे नव्या बदलाचं प्रतिक ठरु शकत नाहीत असं बोललं जातं. कारण ते कित्येक दशकांपासून राजस्थानच्या राजकारणात सक्रिय आहेत. गटबाजीचा आरोपही गहलोत यांच्यावर होत असतो. शिवाय सचिन पायलट यांना काम करताना रोखल्याचा आरोपही काँग्रेसच्याच एका गटाकडून केला जातो.

कोण आहेत सचिन पायलट?

सचिन पायलट हे राजस्थानमधील काँग्रेसचे युवा नेते आहेत. खासदार असलेल्या सचिन पायलट यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि मोठ्या फरकाने ही निवडणूक जिंकली. त्यांच्याकडे गेल्या साडे चार वर्षांपासून काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद आहे. दोन लोकसभा आणि विधानसभेच्या चार पोटनिवडणुका जिंकण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

राजस्थान काँग्रेसमध्ये सचिन पायलट यांच्याकडे नव्या ऊर्जेचं प्रतिक म्हणून पाहिलं जातं. प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना गेल्या पाच वर्षात त्यांनी काँग्रेसची संख्या 21 वरुन 100 वर नेली आहे. असं असलं तरी सचिन पायलट हे उद्धट असल्याचा आरोपही केला जातो. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचं पाठबळ आणि जनतेच्या पाठिंब्याची उणीव आहे.

संबंधित बातम्या 

राजस्थानमध्ये अशोक गहलोतच मुख्यमंत्री!  

सत्तेनंतर खुर्चीसाठी वाद, राजस्थानात काँग्रेसमधले दोन गट भिडले    

राजस्थानमध्ये 28 वर्षांपासूनची परंपरा यावेळीही कायम

निकालाआधीच विकिपीडिया अपडेट, राजस्थानचा मुख्यमंत्रीही ठरवला!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI