होमगार्डला शिवीगाळ, अभिजीत बिचुकलेंविरोधात गुन्हा

होमगार्डला शिवीगाळ करुन शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी अभिजीत बिचुकले यांच्याविरोधात साताऱ्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

होमगार्डला शिवीगाळ, अभिजीत बिचुकलेंविरोधात गुन्हा

सातारा : ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिजीत बिचुकले यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा (Abhijeet Bichukale FIR in Satara) दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी बिचुकलेंविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

शिर्के शाळा मतदान केंद्रावर अभिजीत बिचुकले सहकुटुंब मतदान करण्यासाठी आले होते. यावेळी होमगार्डने काठी आडवी लावल्यामुळे बिचुकलेंचा वाद झडला. त्यावेळी बिचुकलेंनी होमगार्डला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी संबंधित होमगार्डने सातारा शहर पोलिस ठाण्यात बिचुकलेंविरोधात तक्रार दिली होती.

सातारा शहर पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी बिचुकलेंवर गुन्हा दाखल केला आहे. जावळी विधानसभा आणि वरळी विधानसभा या दोन ठिकाणी अभिजीत बिचुकले हे अपक्ष उमेदवारी लढवत आहेत.

दरम्यान, अभिजीत बिचुकले यांच्याशी संपर्क साधला असता हे सर्व राजकीय षडयंत्र असल्याचा दावा त्यांनी केला आहे. उलट तक्रारदार होमगार्डचीच मी तक्रार दाखल करणार असल्याचं बिचुकले यांनी (Abhijeet Bichukale FIR in Satara) सांगितलं.

अभिजीत बिचुकले यांच्याविरोधात याआधीही चेक बाऊन्स प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘बिग बॉस’च्या घरात असताना बिचुकलेंची धरपकड झाली होती आणि त्यांना तुरुंगवारीही घडली होती.

याआधी, बिचुकलेंसह वरळी मतदारसंघातील तीन उमेदवारांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली होती. निश्चित केलेल्या दैनिक खर्च नोंदवह्या तपासणीसाठी सादर केल्या नसल्याने ही कारवाई करण्यात आली होती.

ना कोटी, ना लाख, अभिजीत बिचुकलेंची संपत्ती हजारांच्या घरात

अभिजीत बिचुकले यांनी आपली एकूण संपत्ती 78 हजार 503 रुपयेअसल्याचं निवडणूक प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे. विशेष म्हणजे त्यांची पत्नी अलंकृता यांच्या नावावर बिचुकलेंच्या चौपट संपत्ती असल्याचं दिसत आहे. अलंकृता बिचुकले यांच्या नावावर तीन लाख 66 हजार 818 रुपये असल्याचं बिचुकलेंनी सांगितलं आहे.

कोण आहे अभिजीत बिचुकले ? 

  • अभिजीत बिचुकले हे साताऱ्यातील फेमस व्यक्तिमत्त्व आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यामुळे ते राज्यभर चर्चेत आले.
  • अभिजीत बिचुकले बिग बॉस मराठी सिझन 2 मधील स्पर्धक
  • अभिजीत बिचुकले स्वत:ला कवी म्हणवून घेतात. त्यांनी आतापर्यंत नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंतच्या अनेक निवडणुका लढवल्या आहेत.
  • साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यांनी कित्येकदा खुलेआम आव्हान दिलं आहे.
  • बिग बॉसच्या घरात वादग्रस्त वक्तव्य करणे, टास्क खेळताना नियमांच्या विरुद्ध वागणे, घरातील महिला सदस्यांसोबत फर्ल्ट करणे यासाठी प्रसिद्ध आहे. बिग बॉसच्या घरात वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना अल्पावधीतच प्रसिद्ध मिळाली आहे.
  • यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सातारा आणि सांगलीतून त्यांनी उमेदवारी अर्जही भरला होता.

आदित्य ठाकरे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवत असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वरळी मतदारसंघाकडे लागलं आहे. ‘बिग बॉस’मुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले बिचुकलेही या मतदारसंघातून नशीब आजमावत असल्याने अनेकांच्या नजरा वळल्या आहेत.

संबंधित बातम्या 

शरद पवारांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न मी पूर्ण करेन : अभिजित बिचुकले   

पवारसाहेब उभे राहिले तरीही 100 टक्के लढणार : अभिजीत बिचुकले 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI