Abhishek Sharma: अभिषेक शर्मा उजव्या कानाजवळ कमकुवत, प्रतिस्पर्धी संघाना बाद करण्याचं गणित समजलं!
अभिषेक शर्मा समोर असला की प्रतिस्पर्धी गोलंदाजांना धडकी भरते यात काही दुमत नाही. पण आता गोलंदाजांनाही त्याला बाद करण्याचं गणित उमगलं आहे. ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिणी अफ्रिकी गोलंदाजीही तीच पद्धत अवलंबत आहेत. चला जाणून घेऊयात काय ते...

अभिषेक शर्मा हे भारताचं टी20 क्रिकेटमधील ओपनिंगचं महत्त्वाचं अस्त्र आहे. त्याच्या आक्रमक खेळीमुळे भल्याभल्या गोलंदाजांना घाम फुटतो. एकदा त्याचा खेळ सुरु झाला की प्रतिस्पर्धी संघांना सळो की पळो करून सोडतो. पण मागच्या 7 सामन्यात अभिषेक शर्माने एक सारखीच चूक केली आहे. त्यामुळे आता क्रीडाप्रेमींचं टेन्शन वाढलं आहे. विरोधकांना अभिषेक शर्माला बाद करण्याचा फॉर्म्युला सापडल्याचं बोललं जात आहे. मागच्या 7 सामन्यात त्याची कमकुवत बाजू उघड झाली आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी हे आधी हेरलं आणि आता दक्षिण अफ्रिकी गोलंदाजही तोच फॉर्म्युला वापरत आहेत. त्यामुळे यातून अभिषेक शर्मा लवकर सावरला नाही तर वाईट वेळ येण्यास वेळ लागणार नाही.
मागच्या सात सामन्यात अभिषेक शर्माने सामन्यातील फक्त एका डावातच अर्धशतकी खेळी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नमध्ये 68 धावा केल्या. त्यानंतर सहा डावात चांगली सुरुवात केली खरी पण मोठ्या धावसंख्येत रुपांतर करण्यात अपयश आलं. अभिषेक शर्माला मागच्या काही सामन्यात आखुड टप्प्याचा चेंडूंचा सामना करण्यास अडचण आली आहे. अभिषेक शर्मा ऑफ स्टंप बाहेरचा आखुड टप्प्याच्या चेंडू व्यवस्थित खेळतो. पण हाच चेंडू जर उजव्या कानाजवळ आला तर मात्र अडचण येत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे आता गोलंदाज त्याला तसाच चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतात.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत गोलंदाजांनी हीच क्लुप्ती वापरली होती. त्याला आखुड टप्प्याची गोलंदाजी करून हेल्मेटजवळ खेळण्यास भाग पाडत होते. संपूर्ण मालिकेत त्याला ही अडचण जाणवली. आता दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजांनीही त्याचा अभ्यास केलेला दिसत आहे. कटक टी20 सामन्यात सिपामलाने त्याला आखुड टप्प्याचा चेंडू टाकला आणि त्यावर अभिषेकने विकेट फेकली. सिपामलाने सातव्या षटकात अभिषेकला संथ गतीने आखुड टप्प्याचा चेंडू टाकला होता. हा चेंडू फाइन लेगच्या दिशेने फ्लिक केला आणि मार्को यानसेनने त्याचा अप्रतिम झेल पकडला.
Umar gul analysis on abhishek sharma techniques…#PAKvIND #PakistanCricket #indvspak2025 #AbhishekSharma #INDvsPAK pic.twitter.com/fDjmD4zKP1
— Mi-raab (@miraab001) September 22, 2025
उमर गुलने एका मुलाखतीत, अभिषेक शर्माची बॅट पकडण्याच्या शैलीकडे लक्ष वेधलं होतं. बॅट वर पकडत असल्याने शॉर्ट चेंडू टाकला तर चूक करू शकतो. आता सर्व वेगवान गोलंदाज याच कृतीचा उपयोग करून त्याला जाळ्यात ओढत आहेत.
