U19 Asia Cup: 17 चौकार-षटकार आणि 143 धावा, वैभव सूर्यवंशी युएईविरुद्ध पुन्हा एकदा मैदानात उतरणार
Vaibhav Suryavanshi, U19 Asia Cup: अंडर 19 आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडिया मैदानात उतरली आहे. या स्पर्धेत सर्वांचं लक्ष युवा वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे असेल. या स्पर्धेत भारताचा सामना युएई संघाशी होणार आहे. मागच्या पर्वातही याच संघाविरुद्ध पहिल्या चेंडूपासून वैभवने आक्रमक खेळी केली होती.

IND U19 vs UAE U19: अंडर 19 आशिया कप स्पर्धा सुरु होण्यासाठी आता अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. भारत आणि युएई या संघात पहिला सामना होणार आहे. हा सामना 12 डिसेंबरला होणार असून सर्वांच्या नजरा वैभव सूर्यवंशीच्या खेळीकडे असणार आहे. कारण वैभव सूर्यवंशीने या वर्षी आक्रमक खेळी करत क्रीडाप्रेमींचं चांगलंच मनोरंजन केलं आहे. आक्रमक खेळी करत त्याने अल्पावधीतच अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. वैभव सूर्यवंशीचा अंडर 19 आशिया कप स्पर्धेत युएईविरुद्ध दुसरा वनडे सामना असणार आहे. यापूर्वी मागच्या वर्षी झालेल्या स्पर्धेतही युएईविरुद्ध खेळला होता. या सामन्यात वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली होती. तसेच हा सामना भारताने 10 विकेटने जिंकला होता.
भारत युएई सामन्यात काय झालं होतं?
अंडर 19 आशिया कप क्रिकेट स्पर्धेत युएईचा संघ 50 षटकं पूर्ण खेळू शकला नाही. प्रथम फलंदाजी करताना युएईने सर्व गडी गमवून 137 धावा केल्या. तसेच विजयासाठी 138 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान भारताने 17 व्या षटकात एकही गडी न गमावता पूर्ण केलं होतं. वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे ही जोडी मैदानात उतरली होती. या दोघांनी आक्रमक खेळी करत युएईच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं होतं. दोघांच्या आक्रमक खेळीमुळे युएईच्या गोलंदाजांना चेंडू कुठे टाकावा तेच कळत नव्हतं. दोघांनी नाबाद राहात 16.1 षटकात 143 धावा केल्या. यात एकूण 17 चौकार आणि षटकारांचा समावेश होता.
वैभव सूर्यवंशीची नाबाद 76 धावांची खेळी
वैभव सूर्यवंशीने या सामन्यात एकूण 6 षटकार आणि 3 चौकार मारले. यासह त्याने 165.22 च्या स्ट्राईक रेटने 46 चेंडूत नाबाद 76 धावा केल्या. तर दुसर्या बाजूने आयुष म्हात्रेही आक्रमण करत होता. त्याने 131.37 च्या स्ट्राईक रेटने 51 चेंडूत 67 धावा केल्या. यात त्याने 4 चौकार आणि 4 षटकार मारले. आता पुन्हा एकदा ही जोडी अंडर 19 आशिया कप स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. आयुष म्हात्रेकडे संघाचं कर्णधारपद आहे.
अंडर 19 टीम इंडिया : आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, राहुल कुमार, वेदांत त्रिवेदी, विहान मल्होत्रा, युवराज गोहिल, अरोन वर्गिस, बीके किशोर, दीपेश देवेंद्रन, हेनिल पटेल, जगनाथन हेमचुदेशन, खिलान पटेल, किशन कुमार सिंग, अभिज्ञान अभिषेक कुंडू (विकेटकीपर), हरवंश पंगालिया (विकेटकीपर), आदित्य रावत, कनिष्क चौहान, नमन पुष्पक, उद्धव मनिष मोहन.
