ENG vs IND : जो रुट सुस्साट, मँचेस्टरमध्ये ऐतिहासिक शतक, कुमार संगाकाराच्या विक्रमाची बरोबरी
Joe Root Century ENG vs IND 4th Test : जो रुट मायदेशात टीम इंडिया विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये अपेक्षित सुरुवात करु शकला नाही. मात्र जो रुटने तिसऱ्या कसोटीतून जोरदार कमबॅक केलं. रुटने लॉर्ड्सनंतर आता मँचेस्टरमध्ये शतक करत भारतीय संघाच्या अडचणीत वाढ केली आहे.

इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट याने टीम इंडिया विरूद्धच्या कसोटी मालिकेत धावांसह विक्रमांचा तडाखा कायम ठेवला आहे. रुटने चौथ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी मँचेस्टरमध्ये राहुल द्रविड आणि जॅक कॅलिस या दोघांना मागे टाकलं. रुट यासह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला. रुटने त्यानंतर आणखी एक कारनामा केला आहे. रुटने टीम इंडिया विरुद्ध शतक ठोकलं. रुटने यासह श्रीलंकेचा माजी फलंदाज कुमार संगकारा याच्या विक्रमाची बरोबरी केली.
रुटने तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात अंशुल कंबोज याने टाकलेल्या 96 व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर फोर ठोकला. रुटने यासह शतक पूर्ण केलं. रुटच्या कसोटी कारकीर्दीतील हे 38 वं तर टीम इंडिया विरुद्धचं 12 वं शतक ठरलं. रुटने या शतकानंतर रिकी पॉन्टिंग याला मागे टाकलं. रुट यासह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.
संगकाराच्या विक्रमाची बरोबरी
रुटने 178 बॉलमध्ये 57.87 च्या स्ट्राईक रेटने 12 फोरसह हे शतक पूर्ण केलं. रुटने यासह संगकाराच्या 38 शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. रुट यासह सर्वाधिक कसोटी शतकं करणारा संयुक्तरित्या चौथा फलंदाज ठरला.
सर्वाधिक कसोटी शतकं
- सचिन तेंडुलकर : 51
- जॅक कॅलिस : 45
- रिकी पॉन्टिंग : 41
- जो रुट : 38
- कुमार संगकारा : 38
इंग्लंड मजबूत स्थितीत
इंग्लंडने चौथ्या कसोटीवर घट्ट पकड मिळवली आहे. इंग्लंडने टीम इंडियाच्या 358 च्या प्रत्युत्तरात तिसऱ्या दिवसाच्या टी ब्रेकपर्यंत 102 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 433 रन्स केल्या आहेत. इंग्लंडने यासह 75 धावांची आघाडी घेतली आहे. कर्णधार बेन स्टोक्स 36 धावांवर नाबाद आहे. तर जो रुट 201 चेंडूत 13 चौकारांच्या मदतीने 121 धावा करुन नाबाद आहे.
विक्रमवीर जो रुट
Test century: 3️⃣8️⃣
Joe Root continues to defy description.
He is 𝗶𝗻𝗲𝘃𝗶𝘁𝗮𝗯𝗹𝗲. pic.twitter.com/66KNLgp59O
— England Cricket (@englandcricket) July 25, 2025
इंग्लंड मालिकेत आघाडीवर
दरम्यान इंग्लंड अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत आघाडीवर आहे. इंग्लंडने या मालिकेत आतापर्यंत 2 सामने जिंकले आहेत. तर टीम इंडियाने एकमेव सामना जिंकला आहे. इंग्लंड या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. तसेच भारताला मँचेस्टरमध्ये कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकदाही विजयी होता आलेलं नाही. त्यामुळे टीम इंडिया इथून कमबॅक करत पलटवार करणार? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे
