Pakistani Cricketers Marathi: ‘चहा प्यायला चला’,पाकिस्तानी खेळाडूचे मराठी प्रेम, नसीम शहाचा मराठी बोलतानाचा Video Viral
Naseem Shah Marathi Viral Video: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह याने मराठी माणसांची मनं जिंकली आहे. त्याचा मराठीत बोलतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. अनेक जण त्याचं कौतुक करत आहे. तुम्ही पाहिला का हा व्हिडिओ?

Naseem Shah Marathi Speaking Marathi: ‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी’ असं मराठी जण अभिमानानं सांगतात. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. पण जोपर्यंत मराठी जगाची लोकभाषा होत नाही तोपर्यंत मुंबईत मराठीसाठी खळखट्याक ऐकू येईल. त्यासाठी वेगळा प्रयोग राबवणे गरजेचे आहे. लादण्यापेक्षा मराठी ही सर्वांना आपली वाटणं गरजेचं आहे. पाकिस्तानशी आपलं कायमचं वाकडं असलं तरी पहलगाम हल्ल्यानंतर तणाव वाढलेला आहे. पण पाकिस्तानचा क्रिकेटपटू नसीम शाह याचा मराठी बोलतानाचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. नसीम शाह याचा मराठीत संवाद साधत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
चहा प्यायला चला
नसीम शाह याचे एक दोन मराठी वाक्य ऐकून अनेकांना त्याचं अप्रुप वाटत आहे. ILT20 लीगमध्ये नसीम खेळत आहे. त्याला एक मराठी सहकारी भेटला. त्याने त्याच्याकडून काही मराठी वाक्यं शिकून घेतली. नसीमने मग क्रिकेट सोबतच मराठीचाही सराव सुरु केला. त्यानं या वाक्याची घोकंपट्टी केली. उजळणी केली. त्यानंतर त्याने मराठीत संवाद साधला. सोशल मीडियावर सध्या त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो चहा प्यायला चला असे वाक्य म्हणतो. मग व्हिडिओत तो आणि मित्र चहा पितात आणि त्यानंतर नसीम पुन्हा मराठीत बोलतो. “आता मला बरं वाटतंय” असं तो म्हणतो. नसीमचे ही मराठी वाक्य कानाला रसाळ वाटतात. मराठीचा प्रत्येक भागात एक खास पट्टी, लहेजा असते. तशीच ही मराठी कानाला एकदम मस्त वाटते.
Watch naseem shah speak marathi language pic.twitter.com/yybBC6e1GG
— Anuj 🇮🇳 (@AnujKaReview) December 5, 2025
क्रिकेट खेळताना विविध देशातील खेळाडू एकत्र येतात. त्यांच्यात सांस्कृतिक, भाषिक देवाणघेवाण होते. त्यात भारत तर विविधतेने नटलेला देश आहे. अशातच नसीम शाह याला एक मराठी सहकारी भेटला. आम्ही एक महिना एकत्र राहिलो. खेळलो. त्यामुळे सहकाऱ्याकडून काही ना काही शिकायला मिळालं. तर आमच्याही काही गोष्टी त्याने शिकल्या अशी प्रांजळ कबुली नसीमने यावेळी दिली. त्याचा मराठी संवाद पाकिस्तानमध्ये पण चर्चेत आहेत. पाकिस्तानमधील काही तरूणांना कराची येथील मराठी कुटुंबांची पण आठवण झाली. तर यानिमित्ताने बलुचिस्तानमध्ये असलेले बुगाटी मराठा यांची पण अनेक जणांना आठवण झाली. या भाषिक आदान प्रदानमुळे मराठी भाषेची पाकिस्तानमध्ये चर्चा सुरु झाली आहे. मराठी कोणत्या राज्यात बोलली जाते आणि ती किती जुनी आहे. मराठीत कशाला काय म्हणतात याविषयीची माहिती अनेक जण घेत आहेत.
