IND vs PAK : टीम इंडिया महामुकाबल्यासाठी सज्ज, पाकिस्तानचा हिशोब करण्याची संधी
India vs Pakistan U19 Asia Cup 2025 : पाकिस्तानने टीम इंडियाला आजपासून वर्षाआधी पराभूत केलं होतं. अंडर 19 टीम इंडियाला धावांचा पाठलाग करताना पराभूत व्हावं लागलं होतं. आता टीम इंडियाला त्याच पराभवाचा हिशोब करण्याची संधी आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीयांमध्ये पाकिस्तानबाबत प्रचंड चीड आणि तीव्र संताप होता. भारताने या हल्ल्यानंतर पाकिस्तान सोबतचे जवळपास सर्वच व्यवहार बंद केले होते. मात्र याला एक अपवाद होता तो म्हणजे क्रिकेट सामना. या अशा घटनेनंतर मेन्स टी 20I आशिया कप स्पर्धेत पाकिस्तान विरूद्धच्या सामन्याला अनेक राजकीय पक्षांसह संघटनांनीही तीव्र विरोध केला. मात्र त्यानंतरही भारत-पाक (India vs Pakistan) सामना झाला. तेव्हापासून ते आतापर्यंत अनेक वयोगटातील स्पर्धेत टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामने झाले आहेत. आता रविवारी 14 डिसेंबरला पुन्हा एकदा हे 2 कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत.
अंडर 19 आशिया कप स्पर्धेचा थरार
सध्या दुबईत अंडर 19 आशिया कप 2025 स्पर्धेचं (U19 Asia Cup 2025) आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेनिमित्ताने भारत-पाक दोन्ही संघ भिडणार आहेत. या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे. तसेच टीम इंडियासाठी हा सामना फार प्रतिष्ठेचा असणार आहे.
अंडर 19 टीम इंडिया 5 वर्षांची प्रतिक्षा संपवणार?
टीम इंडियाला पाकिस्तान विरुद्ध गेल्या अर्ध्या दशकापासून विजयाची प्रतिक्षा कायम आहे. अंडर 19 टीम इंडियाला गेल्या 5 वर्षांत पाकिस्तान विरुद्ध एकदाही विजयी होता आलेलं नाही. टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्धचा अखेरचा सामना हा 2020 साली जिंकला होता. तेव्हापासून टीम इंडियाची प्रतिक्षा कायम आहे. तर पाकिस्तानने 2020 नंतर टीम इंडिया विरुद्ध सलग 3 सामने जिंकले आहेत.
टीम इंडियाकडे परतफेडीची संधी
अंडर 19 इंडिया आणि पाकिस्तान संघ याआधी वर्षभराआधी नोव्हेंबर 2024 मध्ये आमनेसामने आले होते. तेव्हा पाकिस्तानने टीम इंडियावर 43 धावांनी मात केली होती. आयुष म्हात्रे (Ayush Mhatre) आणि वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) ही स्टार जोडी त्या सामन्यात होती. या दोघांना त्या सामन्यात काही विशेष करता आलं नव्हतं. त्यामुळे वैभव आणि आयुष या स्टार जोडीचा पाकिस्तान विरुद्ध चमकदार कामगिरी करण्याचा प्रयत्न असणार आहे.
सलग दुसरा सामना कोण मिळवणार?
तसेच दोन्ही संघांचा हा या अंडर 19 आशिया कप 2025 स्पर्धेतील दुसरा सामना आहे. दोन्ही संघांनी या मोहिमेत विजयी सलामी दिली आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये सलग दुसरा सामना जिंकण्याची चुरस असणार आहे.
