दक्षिण आफ्रिकेने भारताला फॉलोऑन का दिला नाही? टेम्बा बावुमाचं डोकं कसं चाललं? जाणून घ्या
दुसऱ्या कसोटी सामन्यातही भारताचा पराभव जवळपास निश्चित झाला आहे. कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच पराभवाचं गणित बसलं आहे. त्यामुळे आता भारतीय संघाला एखादा चमत्कारच या पराभवातून वाचवू शकतो. असं असताना दक्षिण अफ्रिकेने 288 धावांची आघाडी असूनही फॉलोऑन दिला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

भारताने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटीत टाकलेले सर्व फासे उलटे पडले. पहिला कसोटी सामना भारतीय फलंदाजांच्या बेजबाबदार फलंदाजीमुळे गमावला. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजीला पूरक खेळपट्टी असूनही भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली. एकीकडे पहिल्या डावात दक्षिण अफ्रिकेने 489 धावा केल्या. तर भारताचा डाव फक्त 201 धावांवर आटोपला. अष्टपैलू खेळाडूंनी घात केला असंच म्हणावं लागेल. कारण मधली फळी निष्फळ ठरली. कर्णधार ऋषभ पंतही काही खास करू शकला. एकंदरीत क्रीडाप्रेमी राग व्यक्त करत असताना भारतीय फलंदाजांना त्याचं सोयरसुतक काहीच नसल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे, दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने मूर्ती लहान पण किर्ती महान या उक्तीप्रमाणे भारताला पराभवाच्या दरीत ढकललं आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात फॉलोऑन न देता फलंदाजी करण्याचा स्मार्ट निर्णय घेतला. 288 धावांची आघाडी असताना असं करण्याचं कारण काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.
टेम्बा बावुमाने फॉलोऑन न देण्याचं कारण काय?
भारताची शेवटची विकेट पडली आणि दक्षिण अफ्रिकेला 288 धावांची आघाडी मिळाली. यानंतर टेम्बा बावुमा थेट मैदानाबाहेर धावत गेला आणि फॉलोऑनबाबत टीम मॅनेजमेंटबरोबर चर्चा केली. त्यानंतर त्याने फॉलोऑन देण्याऐवजी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सर्वाधिक स्कोअर असूनही फॉलोऑन दिला नाही. टेम्बा बावुमाने हा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे. थोड्या वेळ फलंदाजी करून गोलंदाजांना यामुळे आराम मिळेल. कारण दक्षिण अफ्रिकन गोलंदाजांनी पूर्ण दिवस गोलंदाजी केली होती. त्यामुळे गोलंदाज थकले असते. त्याचा परिणाम दुसऱ्या डावावर झाला असता. इतकंच काय भारतीय फलंदाजांनी या संधीचा फायदा घेतला असता.
टीम इंडियाला फॉलोऑन दिला असता आणि त्यात काही आघाडी घेतली असती तर दक्षिण अफ्रिकेला चौथ्या डावात फलंदाजीला यावं लागलं असते. पण आता दक्षिण अफ्रिकेने तिसऱ्या डावात फलंदाजी करत आहेत. त्यामुळे भारताला चौथ्या डावात विजयी धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरावं लागेल. त्यामुळे चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रापर्यंत दक्षिण अफ्रिकन फलंदाज फलंदाजी करतील. तसेच 500 धावांपर्यंत टार्गेट देतील. त्यानंतर दीड दिवसात भारतीय फलंदाजांना बाद करून विजयाचा मानस असेल. आता टेम्बा बावुमा भारतासाठी किती धावांचं लक्ष्य ठेवतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरले.
