INDW vs PAKW : शफाली वर्माने पाकिस्तानविरुद्ध पहिल्याच चेंडूवर रचला विश्वविक्रम, यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं
वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानशी झाला. या सामन्यात भारताचा वरचष्मा दिसला. भारताने पाकिस्तानला 64 धावांनी लोळवलं. पण या सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर शफाली वर्माने विक्रम रचला.

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने विजयी सुरूवात केली आहे. भारताने पहिल्याच सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताने 20 षटकात 6 गडी गमवून 170 धावा केल्या आणि विजयासाठी 171 धावा दिल्या. पण पाकिस्तानला हे आव्हान काही गाठता आलं नाही. पाकिस्तानचा संघ सर्व गडी गमवून 106 धावांपर्यंत मजल मारू शकला. भारताने हा सामना 64 धावांनी जिंकला. या विजयासह भारतीय संघाने स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. मोठ्या विजयामुळे भारतीय संघाला 2 गुणांसोबत +3.200 नेट रनरेट झाला आहे. हाय-व्होल्टेज सामन्यात भारताची धडाकेबाज सलामीवीर शफाली वर्माने नवा विश्वविक्रम रचून इतिहास नोंदवला आहे. या सामन्यात शफाली वर्माने पहिल्याच चेंडूवर विश्वविक्रमाची नोंद केली. यापूर्वी अशी कामगिरी कोणत्याही महिला खेळाडूने केली नव्हती. शफाली वर्माने या सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला.
वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या प्रदीर्घ इतिहासात, सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारी शफाली वर्मा ही एकमेव फलंदाज ठरली आहे. पुरुष क्रिकेटमध्येही असे विक्रम फारच दुर्मिळ आहेत. शफालीने सादिया इक्बालने टाकलेल्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारून पाकिस्तानला बॅकफूटवर ढकललं होतं. तसेच महिला विश्वचषकाच्या इतिहासात डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारी पहिली फलंदाज होण्याचा मान मिळवला होता.शफाली वर्माने हा विक्रम रचला पण मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली. तिने षटकार मारल्यानंतर तीन चेंडू निर्धाव घालवले तसेच पाचव्या चेंडूवर पुन्हा प्रयत्न केला.
पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारणाऱ्या शफाली वर्माने त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण यष्टीरक्षकाने तिचा झेल घेतला आणि ती बाद झाली. शफाली वर्मा 5 चेंडूत 1 षटकाराच्या मदतीने 6 धावा करून बाद झाली. सादिया इकबालनेच तिची विकेट काढली. मुनीबाने तिचा झेल पकडताना कोणतीच चूक केली नाही. दुसरीकडे, शफाली वर्माने तीन षटकं टाकली आणि 22 धावा देत 1 विकेटही काढली.
